काटोलमध्ये कोण मारणार मैदान?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:32+5:302021-01-08T04:23:32+5:30
सौरभ ढोरे कोटल : काटोल तालुक्यात तीन ग्रा. पं. साठी निवडणूक होत असली तरी तालुक्याचा राजकीय पारा चढला आहे. ...

काटोलमध्ये कोण मारणार मैदान?
सौरभ ढोरे
कोटल : काटोल तालुक्यात तीन ग्रा. पं. साठी निवडणूक होत असली तरी तालुक्याचा राजकीय पारा चढला आहे. तालुक्यात विधानसभा व जि. प. निवडणुकीत खांद्याला खांदा लावून फिरणाऱ्या शेकाप आणि राष्ट्रवादीने मात्र माळेगाव ग्रा. पं. साठी एकमेकांविरुद्ध दंड थोपाटले आहेत. ९ सदस्यीय माळेगाव ग्रा. पं. मध्ये शेकाप समर्थित महाविकास आघाडी व राष्ट्रवादी समर्थित समता पॅनेलचे एकूण १८ उमेदवार रिंगणात आहे. येथे ‘एकास एक’ अशी लढत आहे. येथे १३९७ मतदार पुढील पाच वर्षांसाठी गावाचे कारभारी निवडतील. माळेगाव हे जि. प. च्या येनवा सर्कलमध्ये मोडते. जि. प. निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादीने शेकापसाठी सोडली होती. तीत शेकापचे समीर उमप विजयी झाले होते. दुसरीकडे खंडाळा (खु.) व भोरगड ग्रामपंचायतीकरिता भाजप व राष्ट्रवादी समर्थित पॅनेल थेट लढत होत आहे. पारडसिंगा जि. प. सर्कलमध्ये मोडणाऱ्या खंडाळा (खु.) ग्रामपंचायतीमध्ये ७ जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात आहेत. येथे १०७६ मतदार कोणाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याच सर्कलमधील भोरगड ग्रामपंचायतीच्या सात जागांकरिता १६ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत येथे भाजपचे संदीप सरोदे आणि राष्ट्रवादीचे चंद्रशेखर कोल्हे यांच्यात लढत झाली होती. तीत कोल्हे यांनी बाजी मारली होती. त्यामुळे जि.प.तील पराभवाचा वचपा काढण्यासाठी येथे भाजप समर्थित पॅनेलने कंबर कसली आहे. निवडणुका ग्रा.पं.च्या असल्या तरी राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख येथे काय भूमिका घेतात, याकडेही लक्ष लागले आहे.
---
खंडाळा ग्रामपंचायत
एकूण वॉर्ड : ३
एकूण सदस्य : ७
एकूण उमेदवार : १७
एकूण मतदार : १०७६
पुरुष मतदार : ५४६
स्त्री मतदार : ५३०
---
भोरगड ग्रामपंचायत
एकूण वॉर्ड : ३
एकूण सदस्य : ७
एकूण उमेदवार : १६
एकूण मतदार : ९२१
पुरुष मतदार : ५१७
स्त्री मतदार : ४३४
----
माळेगाव ग्रामपंचायत
एकूण वॉर्ड : ३
एकूण सदस्य : ९
एकूण उमेदवार : १८
एकूण मतदार : १३९७
पुरुष मतदार : ६९९
महिला मतदार : ६९८