सुरक्षेची हमी कोण देणार?
By Admin | Updated: August 23, 2016 02:19 IST2016-08-23T02:19:38+5:302016-08-23T02:19:38+5:30
लांब पल्याच्या मार्गावर रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस यात वाढही होत

सुरक्षेची हमी कोण देणार?
नागपूर : लांब पल्याच्या मार्गावर रात्रीच्यावेळी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दिवसेंदिवस यात वाढही होत आहे. मात्र, रविवारी रात्री कोल्हापूरहून नागपूरकडे येणाऱ्या खासगी बसचे सोलापुरात झालेल्या अपहरणाच्या घटनेने प्रवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, आरटीओ कार्यालयांमध्ये प्रवाशांच्या अशा सुरक्षेला घेऊन कुठलेही नियम नाहीत. ट्रॅव्हल्स बस कंपनीकडे प्रवाशांना सुरक्षा पोहचविण्याची यंत्रणा नाही. रात्रीच्यावेळी महामार्गावर पोलिसांची गस्तही फार कमी राहत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सोलापूर येथील बाळे पुलावरून खासगी बस पळवून नेताना आरोपींना पोलिसांनी पकडल्याचा किस्सा ताजा असताना या घटनेची पुनरावृत्ती रविवारी रात्री घडली़ कोल्हापूरहून नागपूरकडे जाणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्स बसच्या अपहरणाचा प्रयत्न फसला. सोलापूर- तुळजापूर मार्गावरील तामलवाडीजवळ हा प्रकार घडला. दरम्यान बस पळवून नेणाऱ्या एकास ग्रामस्थांनी पकडून तालुका पोलिसांच्या हवाली केल्याने मोठा अनर्थ टळला. या दोन घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वी याच मार्गावर रात्रीच्यावेळी एका स्लीपर कोच बसच्या मागील काचावर दगड मारला होता. परंतु चालकाने बस न थांबविता पुढे नेल्याने धोका टळल्याची माहिती आहे.
या मार्गावर नेहमी घडतात घटना
ज्या ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या बसेस रात्रीच्यावेळी धावतात त्यांना याविषयी बोलते केले असता त्यांनी सोलापूर रोड, जालना रोड, हिंगोली-परभणी रोड, इंदोरा-परतवाडा रोड, बैतुल रोड व जबलपूर रोड आदी मार्गावर नेहमीच छोट्या-छोट्या घटना होत असल्याचे सांगितले. या मार्गावर पोलिसांची गस्त वाढविल्यास प्रवासी सुरक्षित राहतील, असेही ते म्हणाले.
नागपुरातील ३० प्रवासी सुखरूप
कोल्हापूरहून नागपूरकडे येणाऱ्या खुराणा ट्रॅव्हल्स आराम बसचा रविवारी रात्री अपहरणाचा प्रयत्न झाला असलातरी नागपुरातील ३० प्रवासी सुखरूप परतले.एम़ एच़ ४०/ए.टी.०१८७ क्रमांकाची ही बस सोमवारी उशीरा नागपुरात पोहचली. बसची समोरची काच आणि मागच्या खिडकीची काच फुटलेली होती. अपहरणकर्त्याने बसच्या मागील खिडकीवर दगड मारल्याने काच फुटून एक प्रवासी जखमी झाला होता. त्याच्यावर रात्रीच प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती खुराणा ट्रॅव्हल्सच्या अधिकाऱ्यांनी दिली.
‘ब्लॅक स्पॉट’वर हवी पोलिसांची गस्त
ज्या मार्गावर रात्रीच्यावेळी नेहमीच अनुचित घटना घडतात त्या ‘ब्लॅक स्पॉट’वर पोलिसांची गस्त असायला हवी. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नच निर्माण होणार नाही. विशेष म्हणजे, आमच्या चालकांना यासंदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामुळेच रविवारी मोठा अनर्थ टाळता आला.
-राणा तिलकराम खुराणा व तुषार खुराणा
संचालक, खुराणा ट्रॅव्हल्स
मोटार वाहन कायद्यात तरतूद नाही
वाहनांचा आकार, योग्यता, सोयी, चालक आदींबाबत मोटार वाहन कायद्यात तरतूद आहे. मात्र प्रवासी वाहतुकीच्या सुरक्षेसंदर्भात तरतूद नाही. असे असलेतरी ज्या मार्गावर नेहमीच अशा अनुचित घटना घडतात त्याची माहिती पोलिसांना दिली जाईल.
-शरद जिचकार
प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण