मोकाट डुकरांना आवरणार कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:13 IST2020-12-30T04:13:23+5:302020-12-30T04:13:23+5:30
मोकाट डुकरांना आवरणार कोण? ()नागरिक त्रस्त : पकडण्याची मोहीम पुन्हा राबविण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गेल्या वर्षी ...

मोकाट डुकरांना आवरणार कोण?
मोकाट डुकरांना आवरणार कोण?
()नागरिक त्रस्त : पकडण्याची मोहीम पुन्हा राबविण्याची गरज
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या वर्षी महापालिकेतर्फे २२ जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान शहरातील मोकाट डुकरे पकडण्याची मोहीम राबविण्यात आली होती. यासाठी तामिळनाडूतील अण्णा पथकाची मदत घेण्यात आली होती. तीन आठवड्यानंतर पथक गावी गेल्यानंतर मोहीम अर्धवट राहिली होती. तर दुसऱ्या पथकाने मोकाट सांड पकडण्याची मोहीम राबविली होती. या मोहिमेनंतर काही भागातील मोकाट सांड व डुकरांना आळा बसला होता. परंतु शहराच्या सर्व भागात ही मोहीम राबविण्यात आलेली नव्हती. आता पुन्हा शहरात मोकाट डुकरांचा त्रास वाढला आहे. या डुकरांना आवर कोण घालणार, असा प्रश्न शहरातील नागरिकांना पडला आहे.
शहरातील पारडी, उत्तर नागपुरातील देसराज ले-आऊट जरीपटका, बँक कॉलनी, सिव्हिल लाईन्स भागातील चेंबर ऑफ कॉमर्स परिसर, गंगाबाई घाट परिसर, नंदनवन, महावीरनगर, मानेवाडा, सोनेगाव, उंटखाना, सुगतनगर, गिट्टीखदान व सिव्हिल लाइन्स यासह शहराच्या विविध भागात डुकरांचा त्रास आहे. या भागात डुकरे पकडण्याची मोहीम राबविण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे. नाल्यात व घाणीच्या ठिकाणी डुकरांचा वावर असतो. घाणीने भरलेली डुकरे आजूबाजूच्या वस्त्यांतही फिरतात. यामुळे आजाराचा धोका आहे. तसेच लहान मुलांवर हल्ला करण्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. या प्रकाराला आळा घालण्याची गरज आहे.
....
स्वतंत्र यंत्रणा निर्माण करावी
डुकरांमुळे नागपूरकरांना मोठा त्रास आहे. याबाबत तक्रारीही करण्यात आल्या होत्या. परंतु मोकाट डुकरांना पकडण्यासाठी मनपाकडे स्वतंत्र यंत्रणा नसल्याने मनपाच्या पशुवैद्यकीय विभागातर्फे कारवाई केली जात नाही. मनपाने मोकाट सांड व डुकरे पकडण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
..........
पोलीस संरक्षणात कारवाईची गरज
गेल्या वर्षी डुकरे पकडणाऱ्या पथकावर डुकरे पाळणाऱ्यांनी हल्ला चढविला होता. याचा विचार करता मनपाच्या पशुवैद्यकीय विभागाने डुकरे पकडण्यासाठी नियोजन करून यासाठी पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. तसेच मोकाट डुकरे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.