अपहरण झाले कुणाचे? दुसऱ्या दिवशीही शोध नाही
By Admin | Updated: July 18, 2014 00:58 IST2014-07-18T00:58:24+5:302014-07-18T00:58:24+5:30
अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही.

अपहरण झाले कुणाचे? दुसऱ्या दिवशीही शोध नाही
अचलपुरातील अपहरण प्रकरण : पोलिसांची तपास मोहीम सुरूच
अचलपूर (अमरावती) : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे तीन शाळकरी मुलींचे अपहरण झाल्याच्या माहितीने संपूर्ण तालुका हादरला असताना दुसऱ्या दिवशी देखील कुणाचेही पालक पोलिसात तक्रार देण्यासाठी आले नाही. त्यामुळे अपहरण झाले कुणाचे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांचे तपासचक्र सुरुच आहे. दुपारपर्यंत पोलिसांनी एकूण ६४ मारोती व्हॅनची तपासणी केली होती.
अचलपूर येथील व्यंकटेश विद्यालयाच्या दोन विद्यार्थिनींनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.
६४ व्हॅनची तपासणी
पांढऱ्या रंगाच्या मारोती ओमनी व्हॅनमधून बुरखाधारी इसमांनी तीन मुलींना चाकूचा धाक दाखवून अपहरण केल्याच्या चर्चेने सर्वत्र खळबळ माजली. पोलिसांनी आतापर्यंत प्रत्यक्षदर्शी मुलींनी सांगितल्यानुसार ६४ मारोती ओमनी कारची तपासणी केली. परतवाड्यात २९, पथ्रोट १२, आसेगाव ७, अचलपूर ११ व सरमसपुरा पोलीस स्टेशन हद्दीत १० वाहनांची तपासणी करण्यात आली. जिल्हा व जिल्ह्याबाहेरील मारोती व्हॅनच्या याद्या पोलिसांनी परिवहन विभागाकडून बोलाविल्या.
तोंडावर दुपट्टा बंदी
परतवाडा-अचलपूर या जुळ्या नगरीतील मुलींच्या तोंडाला स्कार्फ बांधण्यावर बंदी घालण्यात आली आहे. आज शहरात पोलिसांनी चौकाचौकात, रस्त्यावर उभे राहून मुलींना तोंडाला दुपट्टा बांधण्यास मनाई केली.
शाळा-महाविद्यालयांपुढे बंदोबस्त
शाळा-महाविद्यालये सुरू होण्याच्या वेळेवर दोन्ही शहरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काही ठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात आहे.
घटनेने सर्वत्र संभ्रम
ज्या मुलींनी हा प्रकार बघितला त्यांच्यावर विश्वास ठेवून पोलिसांनी आतापर्यंत तपास कामात कुठलीच कुचराई केली नाही. सर्वत्र जिल्हाबंदी करण्यात आली. सीमारेषेवर पोलिसांना तैनात करण्यात आले. शाळा-महाविद्यालयांची अंतर्गत सुरक्षा वाढविण्यात आली. तरीही अपहरण अखेर झाले कुणाचे हा संभ्रम कायम आहे. या घटनेने पालक मात्र आपल्या पाल्यांविषयी जास्त सतर्क झाल्याचे दिसून आले. (तालुका प्रतिनिधी)