‘व्हिल मिस यू प्रफुल्ल बिडवई’

By Admin | Updated: June 25, 2015 03:12 IST2015-06-25T03:12:22+5:302015-06-25T03:12:22+5:30

आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात.

'Who Miss You Praful Bidwai' | ‘व्हिल मिस यू प्रफुल्ल बिडवई’

‘व्हिल मिस यू प्रफुल्ल बिडवई’

नागपूरशी जुळले होते ऋणानुबंध : येथील मातीतून मिळाले निर्भीडतेचे संस्कार
नागपूर : आयुष्यात प्रगतीच्या शिखरावर जाऊन प्रचंड पैसे कमविण्याची संधी असतानादेखील काही व्यक्ती मात्र वेगळा मार्ग निवडतात. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो व समाजावर होणारा अन्याय, जनतेची होणारी दिशाभूल यांच्यावर प्रकाश टाकण्यासाठी ते स्वत:ला समर्पित करतात. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल बिडवई हे देखील यातीलच होते. पत्रकारितेच्या क्षेत्रात मोठे नाव झाल्यावरदेखील त्यांचे पाय जमिनीशी घट्ट जुळले होते. विदर्भातील मातीतील सुपुत्र असलेल्या बिडवई यांचे उपराजधानीशी वेगळेच ऋणानुबंध होते. म्हणूनच सातासमुद्रापार ‘अ‍ॅमस्टरडॅम’ येथे त्यांचे अचानक निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर नागपुरातील त्यांच्याशी अथवा त्यांच्या लेखणीशी परिचित असलेल्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आले. तोंडातून निघाले ‘व्हिल मिस यू डिअर प्रफुल्ल बिडवई’!
उपराजधानीच्या मातीशी प्रफुल्ल बिडवई यांचे फार जवळचे संबंध होते. येथे त्यांचे अनेक मित्र तर होतेच. एका पत्रकारासोबतच ते विविध चळवळींशी जुळलेले कार्यकर्तादेखील होते. जगामध्ये अण्वस्त्रांच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणाला धोका आहे हे त्यांचे स्पष्ट मत होते. पर्यावरण रक्षणासाठी व अण्वस्त्रांविरुद्ध जागृतीसाठी सुरेश खैरनार यांच्यासारख्या समविचारी लोकांना एकत्रित घेऊन ‘सीएनडीपी’ (कोअ‍ॅलिएशन फॉर न्यूक्लिअर डिसआर्ममेंट अ‍ॅन्ड पीस) या संघटनेची स्थापना केली होती. विशेष म्हणजे याची स्थापनाही नागपुरात झाली. येथील ‘इंडियन पीस सेंटर’ येथे २००० साली याची पहिली बैठक झाली. त्यांचा जन्म अमरावतीचा होता. सत्तरच्या दशकात तर ‘मागोवा गट’ तसेच इतर बऱ्याच चळवळींसाठी ते नागपुरातच राहायचे व येथूनच त्यांच्यामधल्या पत्रकाराची जडणघडण होत गेली. नागपूरच्या माध्यमातून अनुभवलेल्या विविध सामाजिक समस्यांना त्यांनी समर्पकपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर मांडले. (प्रतिनिधी)
माझा मार्गदर्शक हरविला
प्रफुल्ल बिडवई व माझे संबंध हे गेल्या ५० वर्षांपासूनचे म्हणजे विद्यार्थीदशेपासूनचे आहेत. बारावीनंतर त्यांनी ‘आयआयटी-पवई’त प्रवेश घेतला होता. परंतु अखेरच्या वर्षात ते तेथून परतले. अमरावतीच्या विदर्भ महाविद्यालयात प्राचार्य असलेल्या त्यांच्या वडिलांनी खूप रागावले. परंतु बिडवई यांनी स्वत:ची भूमिका त्यांना समजावून सांगितली व ते पत्रकारितेसाठी मुंबईकडे रवाना झाले. विविध विषयांवर त्यांचा सखोल अभ्यास होता. सत्तरच्या दशकातील विविध चळवळींमध्ये ते सक्रिय होते. तेथीलच धडाडी व निर्भीडपणा त्यांच्या लेखणीतून उमटायचा. कमवलेला पैसा त्यांनी स्वत:पेक्षा विविध चळवळींना मुक्तहस्ते दान केला. माझे तर ते बौद्धिक मार्गदर्शकच होते. ‘सीएनडीपी’च्या बैठकीसाठी ते नेहमी नागपुरात यायचेच. काही महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत ऐनवेळी ते येऊ शकले नाही. पुस्तकाच्या प्रकाशनाची घाईगडबड असल्याने येऊ शकणार नाही हे त्यांनी कळविले. त्या बैठकीत त्यांची कमतरता प्रकर्षाने जाणवली व यापुढे ती नेहमीच जाणवेल.
-डॉ.सुरेश खैरनार, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते
प्रागतिक विचारसरणीचा पत्रकार
पत्रकारिता नेमकी कशी करावी याचे उदाहरणच प्रफुल्ल बिडवई यांनी घालून दिले होते. देशातील अतिशय महत्त्वाचे ते पत्रकार होते. पण कधीही कोणाच्या दबावात आले नाही. प्रागतिक विचारसरणीला त्यांनी नेहमी प्राधान्य दिले. नागपुरशी शैक्षणिक दशेपासूनच त्यांचा संबंध आला होता. त्यामुळे उपराजधानीशी जुळलेला एक विचारवंत अचानक निघून गेल्याची खंत आहे.
-डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ कवी-समीक्षक
अभ्यासू पत्रकार अन् मित्र
प्रफुल्ल बिडवई यांच्याशी विविध सभा अन् कार्यक्रमांच्या माध्यमातून संबंध आला होता. एक व्यक्ती म्हणून ते अतिशय मनमिळावू तर होतेच. परंतु सोबतच अभ्यासू, वैचारिक पठणीतील पत्रकार होते. समाजवादी दृष्टीकोनाचे त्यांचे विचार होते. महत्त्वाचे म्हणजे कुठल्याही दबावाशिवाय ते पत्रकारिता करायचे व सत्य लेखणीतून मांडायचे. नागपुरशी त्याचा लहानपणापासून विविध माध्यमांतून संबंध राहिला आहे. त्यामुळे हे केवळ पत्रकारितेचेच नाही तर त्यांच्या अनेक मित्रांचे कधीही भरुन न निघणारे वैयक्तिक नुकसान आहे.
-डॉ.रतिनाथ मिश्रा, भाकप
पत्रकारितेतील स्तंभ
प्रफुल्ल बिडवई हे नाव घेतले की डोळ््यासमोर येते ती निर्भीड अन् सत्याची बाजू घेणाऱ्या पत्रकाराचा चेहरा. बिडवई हे त्यांच्या लेखणीमुळे विचारवंतांमध्ये सुपरिचित होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले तरी चळवळींशी त्यांची नाळ जुळलेली होती. इंदिरा गांधी असो किंवा नरेंद्र मोदी, बिडवई यांनी त्यांच्यावर निर्भिडपणे टीका करत भाष्य केले. कुठलाही आडपडदा नाही अन् कुठलाही बडेजावपणा नाही असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. ते डाव्या विचारसरणीचे असल्याचे म्हटल्या जात होते. परंतु डाव्या पक्षांवरदेखील त्यांनी लेखणीच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती. विदर्भाच्या या सुपूत्राला देश मुकला आहे.
-उमेश चौबे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते

Web Title: 'Who Miss You Praful Bidwai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.