सराफा असोसिएशनची धुरा कुणाकडे?
By Admin | Updated: April 20, 2017 02:53 IST2017-04-20T02:53:14+5:302017-04-20T02:53:14+5:30
पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रांतर्गत कार्यरत सोना-चांदी ओळ कमिटीची प्रतिष्ठेची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवार, २१ एप्रिलला होणार आहे.

सराफा असोसिएशनची धुरा कुणाकडे?
उद्या निवडणूक : युवा सराफांची महत्त्वाची भूमिका
नागपूर : पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रांतर्गत कार्यरत सोना-चांदी ओळ कमिटीची प्रतिष्ठेची त्रैवार्षिक निवडणूक शुक्रवार, २१ एप्रिलला होणार आहे. या निवडणुकीत दोन पॅनल रिंगणात असून सत्तारूढ पॅनल साडेतीन वर्षांतील प्रगतीचा आढावा घेऊन मतदारांकडे जात आहे. तर विरोधी पॅनलला विजयासाठी कठोर परिश्रम करावे लागत आहे. असोसिएशनची धुरा कुणाकडे जाणार, याकडे सराफांचे लक्ष लागले आहे.
तसे पाहता असोसिएशनची निवडणूक १६ मार्चला रजवाडा पॅलेसमध्ये होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर होणार होती. पण विरोधी पॅनलने गोंधळ घातल्यामुळे सभा सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालली. अखेर वेळेअभावी निवडणूक स्थगित करावी लागली. अशीच घटना साडेतीन वर्षांपूर्वी घडली. त्यावेळी असोसिएशनची धुरा सांभाळणाऱ्या चार वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी स्वत:ला अध्यक्षपद मिळावे म्हणून मागणी केली होती. त्यावेळी अध्यक्षपदावर एकमत न झाल्यामुळे सर्व पदाधिकारी सभा सोडून निघून गेले होते. त्यावेळी निवडणूक अधिकारी राजेश काटकोरिया यांनी निवडणूक स्थगित केली आणि एक महिन्यानंतर पुन्हा निवडणूक घेण्याची घोषणा केली. तेव्हाही चारही पदाधिकाऱ्यांचे अध्यक्षपदावर एकमत न झाल्याने ते सभेतून निघून गेले. तेव्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सराफांना बोलवून त्यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा केली. निवडणूक न झाल्यास असोसिएशनचा कार्यभार चॅरिटी कमिश्नरकडे जाईल, असे सांगण्यात आले. ज्येष्ठ सराफांनी होकार दिल्यानंतर पुन्हा सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली. नावेही मागविण्यात आली. तेव्हा नंदकुमार निनावे हे निवडणूक अधिकारी होते.
अधिकाऱ्यांनी १४ जणांचा समावेश असलेल्या कार्यकारिणीची निवड केली आणि रविकांत हरडे यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा सोपविली. त्यावेळी राजेश काटकोरिया सचिव, पुरुषोत्तम कावळे उपाध्यक्ष आणि राजेश रोकडे यांच्याकडे सहसचिवपद सोपविले. नवीन कार्यकारिणीने साडेतीन वर्षांत संस्था नावरूपाला आणली. त्यांच्या कार्यकाळात अनेक चांगल्या गोष्टी घडून आल्या. एलबीटी (मनपा) आणि एक्साईज विभागाविरुद्ध लढा उभारला. त्यात त्यांना यश आले. अनावश्यक खर्चावर प्रतिबंध लावले.
असोसिएशनने इतवारीत वातानुकूलित हॉल उभारला. इतवारी सराफा बाजारत सीसीटीव्ही लावले. तेव्हापासून पोलिसांच्या खोट्या तक्रारी कमी झाल्या. सभासद मोहीम राबविली. याशिवाय कायद्याची माहिती दिल्याने सराफा सक्षम झाले. युवा सराफा व्यापारी या असोसिएशनकडे वळला. वार्षिक सभेत २५० पेक्षा जास्त सराफा हजेरी लावू लागले. संस्था नावारूपास आल्याने पूर्वी सोडून गेलेल्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा अध्यक्षपदाची स्वप्ने पडू लागली. त्यामुळचे आता वयस्क सराफा व्यावसायिक पॅनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सध्या असोसिएशनचे २५० सभासद आहेत. सभासदत्त्वाची तीन वर्षे पूर्ण केलेल्यांना मतदानाचा अधिकार आहे. सभासद होताना सराफाला अनेक प्रक्रियेतून जावे लागते. नागपुरात सराफाचे स्थायी दुकान असावे, त्याच्यावर फौजदारी गुन्हा नसावा, त्याच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत यासह अनेक अटींची पूर्तता केल्यानंतर सराफाला असोसिएशनचे सभासद होता येते. अटी आणि नियमांचे पालन करणाऱ्या असोसिएशनच्या निवडणुकीत धुरा कुणाकडे जाते, याकडे नागपुरातील सराफांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)