कौन है, कौन है...वो डॉन है!
By Admin | Updated: May 6, 2015 02:14 IST2015-05-06T02:14:59+5:302015-05-06T02:14:59+5:30
डॉन बाहेर येताच साडेपाच-पावणेसहा फूट उंचीच्या १० ते १५ तरुणांनी ‘त्यांच्या’भोवती सुरक्षा कडे केले. गर्दी वाढतच होती. अवघे २५ फूट अंतर चालेपर्यंत रेटारेटी झाली.

कौन है, कौन है...वो डॉन है!
नागपूर : डॉन बाहेर येताच साडेपाच-पावणेसहा फूट उंचीच्या १० ते १५ तरुणांनी ‘त्यांच्या’भोवती सुरक्षा कडे केले. गर्दी वाढतच होती. अवघे २५ फूट अंतर चालेपर्यंत रेटारेटी झाली. गळ्यात सोनसाखळ्या अन् हातात जाडजूड कडे, ब्रेसलेट घातलेल्यांनी ‘त्यांना’ ब्लॅक इन्डेव्हर(एमएच ४३/ ए ६९९९)मध्ये बसवले.
या आलिशान कारच्या मागे आणि पुढे १० ते १५ कारचा ताफा सुसाट वेगाने रामनगरकडे निघाला. या गर्दीत पाच-दहा लोक बाहेरचेही होते. कौन है, कौन है, अशी त्यांनी विचारणा केली. अनेकांनी एकसाथ उत्तर दिले... वो डॉन है!
तडका बहोत पसंद है !
डॉनचा काफिला सुसाट वेगाने रामनगरमधील हरीश हिरणवार यांच्या घरी पोहचला. हिरणवार कुटुंबीय गवळी यांच्या नात्यात लागतात. सोबतच अरुण गवळींची सूनसुद्धा हिरणवार यांची भाची आहे. अर्थात् वर आणि वधू पक्षाकडूनही नातेसंबंध असल्यामुळे हिरणवार कुटुंबीयांकडे गवळीचा ताफा दुपारी २ वाजता तिथे पोहचला.
अनेक दिवसांपासून घरच्या जेवणापासून दूर असलेल्या अरुण गवळी व अन्य नातेवाईकांपुढे हिरणवार परिवाराने विविध पदार्थ वाढले. गवळीने ‘दाल तडका अन् रोटी’ वर ताव मारला. (त्यांना म्हणे दाल तडका फारच आवडतो) दुपारी ४.३०पर्यंत अनेकांशी भेटीगाठी अन् फोटोसेशन झाल्यानंतर गवळी रामदासपेठेतील हॉटेलमध्ये आला. सायंकाळचे विमान असल्यामुळे ६.३० च्या सुमारास विमानतळावर डॉनचा काफिला पोहचला. पुन्हा कुजबुज सुरू करत डॉन मुंबईकडे रवाना झाला. (प्रतिनिधी)
डॅडीच्या ‘मूड’ वर
डॉनच्या स्वभावाशी पुरते परिचित असलेल्या या साथीदारांनी मुंबईला जाण्यासाठी हवाई आणि बाय रोड अशी दुहेरी व्यवस्था करून ठेवली होती. रखरखते ऊन लक्षात घेता रामदासपेठेतील एका आलिशान हॉटेलचा सूटही बूक करून ठेवला होता. बाहेर आल्यानंतर त्याचा मूड कसा असेल, हे आम्हाला सांगता येणार नाही. त्यामुळे डॅडींसाठी त्याच्या आवडीच्या इन्डेव्हरसह ५ गाड्या अन् आमच्यासाठी आणखी ८ ते १० गाड्या आहेत, असे त्यांचा एक साथीदार लोकमतशी बोलताना सांगत होता. एकदाचे ‘त्यांचे’ डॅडी बाहेर आले अन् ब्लॅक इन्डेव्हरमध्ये बसले.
वाहनचालकांनी सिग्नल तोडले?
अरुण गवळीच्या सोबत असलेल्या काही वाहनचालकांनी रामनगरकडे जाताना अनेक सिग्नल तोडल्याची चर्चा आहे. ‘रेड लाईट‘ असूनही त्याला न जुमानता अनेक वाहनचालकांनी सिग्नल तोडले. अलंकार परिसरात काही पोलिसांनी यावेळी नुसती बघ्याची भूमिका बजावल्याची चर्चा आहे. या संदर्भात पोलिसांकडे विचारणा केली असता कुणाकडेही याबाबत माहिती नसल्याचे सांगण्यात आले.