१०१ व्या दीक्षांत समारंभाला अतिथी कोण?
By Admin | Updated: January 9, 2015 00:45 IST2015-01-09T00:45:26+5:302015-01-09T00:45:26+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात नेमके कोणाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचे

१०१ व्या दीक्षांत समारंभाला अतिथी कोण?
नागपूर विद्यापीठ : सी.एन.आर.राव, कैलाश सत्यार्थींना बोलविण्याचा मानस
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा १०१ वा दीक्षांत समारंभ २० फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. या दीक्षांत समारंभात नेमके कोणाला मुख्य अतिथी म्हणून बोलवायचे यासंदर्भात गुरुवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. सुप्रसिद्ध वैज्ञानिक व भारतरत्न पुरस्कारप्राप्त सी.एन.आर.राव किंवा नोबेल शांती पुरस्कार विजेते समाजसेवक कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर एकमत झाले. या दोघांना या सोहळ््यासाठी आमंत्रित करण्याचे प्रयत्न करण्यात येतील अशी माहिती सूत्रांनी दिली.
नागपूर विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ यशस्वीपणे पार पडला. परंतु हा समारंभ सुमारे वर्षभर लांबल्यामुळे १०१ व्या दीक्षांत समारंभासाठी मुहूर्त कधी निघणार यासंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. अखेर २० फेब्रुवारी रोजी हा दीक्षांत समारंभ आयोजित करण्याचे निश्चित झाले व राज्यपाल कार्यालयाकडूनदेखील या तारखेला आयोजन करण्यास मंजुरी देण्यात आली.
गुरुवारी झालेल्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मुख्य अतिथी म्हणून कोणाला आमंत्रित करायचे यासंदर्भात चर्चा झाली. या समारंभाला राजकारणी नव्हे तर शैक्षणिक व्यक्तीच मुख्य अतिथी म्हणून बोलविण्यात यावे असा सदस्यांचा सूर दिसून आला. यावेळी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील निरनिराळ््या व्यक्तींची नावे सदस्यांकडून सुचविण्यात आली. यात भारतरत्न सी.एन.आर.राव तसेच कैलाश सत्यार्थी यांच्या नावांवर भर देण्यात आला.
या दोघाही मान्यवरांना संपर्क करून निमंत्रण देण्यात येईल अशी माहिती विद्यापीठातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान या समारंभाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असावी यासाठी विनंती करण्यात येईल असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)