थडीपवनी उपकेंद्राचा वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:10 IST2021-09-23T04:10:18+5:302021-09-23T04:10:18+5:30
जलालखेडा: नरखेड तालुक्यातील मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या थडीपवनी येथे उपकेंद्र म्हणून ॲलोपॅथी दवाखाना आहे. या केंद्रात गेल्या काही ...

थडीपवनी उपकेंद्राचा वाली कोण?
जलालखेडा: नरखेड तालुक्यातील मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या थडीपवनी येथे उपकेंद्र म्हणून ॲलोपॅथी दवाखाना आहे. या केंद्रात गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर नसल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येथील डॉक्टरांची ९ सप्टेंबरला बदली झाली. त्यानंतर या उपकेंद्राचा प्रभार एका महिला डॉक्टरकडे देण्यात आला. परंतु ते दूर असल्याने उपकेंद्राचा प्रभार स्वीकारण्यास त्यांनी असमर्थता दर्शविली आहे. गत १५ दिवसांपासून या उपकेंद्रात डॉक्टर नसल्याने उपकेंद्र वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. कोरोना सारख्या महामारीत उपकेंद्रात डॉक्टर नसणे ही चिंतेची बाब आहे. तसेच सध्या डेंग्यू, मलेरिया व व्हायरल मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या सर्व गोष्टींची माहिती असताना आरोग्य विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. तसेच या भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसत आहे.
नरखेड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन डॉक्टर आहे. तिथल्या एखाद्या डॉक्टरांना प्रभार दिल्या जाऊ शकतो परंतु असे काही करताना तालुका आरोग्य अधिकारी दिसत नाही. या उपकेंद्र अंतर्गत थंडीपवनी, बानोर बरडपवणी, खेडी, खरबडी, अंबाडा, सायावडा, तारा, उतारा, खलानगोंदी, खारगड ही गावे येत असून या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे. येत्या दोन दिवसात या उपकेंद्रात डॉक्टर रुजू न केल्यास उपकेंद्राला कुलूप ठोकू असा इशारा पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांनी दिला आहे.
--
येथील डॉक्टरांची विनंती बदली झाली असल्यामुळे या उपकेंद्राचा चार्ज महिला डॉक्टर यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु त्या अजून पर्यंत तिथे रुजू झाल्या नाही. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच या उपकेंद्रात डॉक्टर रुजू करण्यात येईल.
- डॉ. विद्यानंद गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी.
210921\1222img-20210920-wa0111.jpg
फोटो ओळी. डॉक्टर नसल्यामुळे शोभेची वस्तू बनलेले थडीपवनी येथील उपकेंद्र.