लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रविवारची सुट्टी म्हटलं की अनेकांसाठी निर्वातपणा, कुटुंबीयांसोबत वेळ किंवा मित्रांसोबत गप्पांचा दिवस मात्र, नागपूरच्या मनीष नगरातील एका बिअर बारमध्ये आज (रविवारी) जे चित्र दिसलं, ते डोळे पांढरे करणारे होते. भर दुपारी गजबजलेल्या या बारमध्ये दारूचे घोट घेत तीन व्यक्ती चक्क महाराष्ट्र शासनाच्या फायलींचा गठ्ठा घेऊन बसले होते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यापैकी एकजण भराभर त्या फायलींवर सह्या करत होता. या प्रकाराने बारमधील उपस्थितांच्या आणि परिसरातील नागरिकांच्या भुवया उंचावल्या.
प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३:३० च्या सुमारास तीन व्यक्ती मनीष नगरातील या बिअर बारमध्ये आल्या. त्यांनी दारूची ऑर्डर दिली आणि त्यानंतर टेबलावर शासकीय फायलींचा एक मोठा गष्ठा ठेवला. जवळपास तासभर त्यांच्यात या फायलींवरून गंभीर चर्चा सुरू होती. ही चर्चा नेमकी कोणत्या विषयावर होती, हे स्पष्ट होऊ शकले नाही, परंतु, चर्चेनंतर एका व्यक्तीने महाराष्ट्र शासन लिहिलेल्या फायलींवर भराभर सह्या करण्यास सुरुवात केली.
सीसीटीव्ही फुटेजमधून उलगडा शक्य ?मनीष नगरातील 'या' प्रसिद्ध बिअर बारमध्ये जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन रविवार दुपारचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास, 'हे' अधिकारी कोण होते आणि 'त्यांनी' कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर सह्या केल्या, हे कळू शकेल. मात्र, प्रशासन किंवा पोलिस या प्रकरणात लक्ष घालणार का आणि दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
'ते' अधिकारी कोण?या प्रकारामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'हे' अधिकारी कोण होते, 'ते' कोणत्या विभागाचे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 'त्यांनी' कोणत्या महत्त्वाच्या फायलींवर सह्या केल्या, याबाबत नागरिकांमध्ये कुतुहल आणि आश्चर्य व्यक्त होत आहे.
गोपनीयतेला हरताळ?बिअर बारसारख्या ठिकाणी शासकीय कामकाजाच्या फायली घेऊन चर्चा करणे आणि त्यावर सह्या करणे हे शासकीय नियमांचे उघड उल्लंघन नाही का, असा संतप्त प्रश्न आहे. शासकीय कामकाजाची गोपनीयता आणि नियमांनुसार कामकाज करण्याची अपेक्षा असताना, अशा प्रकारे उघडपणे फायलींवर सह्या होणं निश्चितच गंभीर आहे.