आघाडीला पाठिंबा देताच आमच्यावर दडपण आणले होते : उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 11:20 PM2019-12-18T23:20:54+5:302019-12-18T23:22:41+5:30
सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सत्तास्थापनेच्या घडामोडीदरम्यान आम्ही शिवसेनेचा पाठिंबा आघाडीला जाहीर करताच एकच भूकंप झाला. हे असे होऊच कसे शकते, असा प्रश्नही उपस्थित झाला. आमच्यावर दडपण आणण्याचाही जोरदार प्रयत्न झाला. रोज तारखा आणि ‘नाही तर...’ असा दमही भरला जायचा, अशी खळबळजनक माहिती उद्धव ठाकरे यांनी प्रथमच जाहीरपणे नागपुरात दिली.
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाषणादरम्यान ते म्हणाले, आम्ही पाठिंबा दिल्यावरही त्यांच्याकडून रोज तारखा दिल्या जायच्या. मात्र आम्ही घेतलेल्या निर्णयावर ठाम होतो. म्हणूनच महाराष्ट्राच्या अभिमानात सहभागी होता आले.
या व्यासपीठावर एकीकडे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, दुसरीकडे शरद पवार, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, काँग्रेस- राष्ट्रवादीतील नेते आणि मध्ये मी बसलो आहे. उद्याचा वर्तमानपत्रातील हा फोटो इतरांसाठी मात्र धक्कादायक असेल. माजी आणि आजी मुख्यमंत्री एक त्रित दिसणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. ती आज यानिमित्ताने दिसत असल्याचा आनंद वाटतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आपल्याच माणसांच्या मागे तलवार घेऊन लागणे, ही महाराष्ट्राची परंपरा नव्हे, असाही टोलाही त्यांनी यावेळी हाणला.