सोशल मीडियावर प्रचार करताना...
By Admin | Updated: October 8, 2014 00:51 IST2014-10-08T00:51:50+5:302014-10-08T00:51:50+5:30
विधानसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी परवानगी

सोशल मीडियावर प्रचार करताना...
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर करण्यात येणाऱ्या उमेदवारांच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. उमेदवारांनी परवानगी घेऊनच सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध करावा, असे आवाहन स्वीपचे पर्यवेक्षक विजयकुमार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील छत्रपती सभागृहात स्वीप व माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (एमसीएमसी) व अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते आढावा घेताना बोलत होते.
सध्याच्या परिस्थितीत फेसबुक व व्हॉट्स अप सारख्या मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. निवडणुकीच्या काळात स्वत:ची जाहिरात व प्रचार करण्यासाठी या सोशल मीडियावर विविध प्रकारचा मजकूर प्रसिद्ध करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही असामाजिक तत्त्वांकडून उमेदवार किंवा विविध पक्षाच्या नावाने खोटा मजकूर टाकून नागरिकांची दिशाभूल करण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकाराचा उमेदवारांनाही त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी सोशल मीडियावर मजकूर प्रसिद्ध करण्यापूर्वी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीकडून परवानगीचे प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या चमूच्या माध्यमातून व्होटर स्लीप वाटपाचा कार्यक्रम सुरू केला असून प्रत्येक मतदारापर्यंत व्होटर स्लीप पोहोचविण्याची विशेष काळजी घ्यावी, तसेच मतदारांच्या नावाची ‘व्होटर लिस्ट’ त्यांच्या घरातील सदस्यांच्या हातीच देण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.
मतदान जागृतीसाठी घरोघरी जाऊन मतदानाची तारीख व वेळ नमूद असलेले स्टीकर्स दारावर चिकटविण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
मतदार जनजागृतीसाठी स्वीपचे कार्य सुरू असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यासाठी विविध ठिकाणी होर्डिंग्ज, बॅनर, पोस्टर, पथनाट्य, पॉम्प्लेट आदींच्या माध्यमातून प्रचार करावा, तसेच सामाजिक संघटनांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदार जनजागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी अजय रामटेके, एमसीएमसीचे नोडल अधिकारी गिरीश जोशी, निवडणूक निर्णय अधिकारी सर्वश्री प्रकाश शर्मा, बी.एस. मेश्राम, संगीतराव, नोडल अधिकारी राजेंद्र गोसावी, प्रकल्प अधिकारी दि.भा. मेंडके, डी.बी. जांभुळकर, दूरदर्शनचे कार्यक्रम अधिकारी निसार अहमद खान, आकाशवाणीचे संचालक चंद्रमणी बेसेकर, कार्यक्रम अधिकारी प्रदीप जारुंडे, डॉ. भाऊ दायदार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल ठाकरे, सहायक आयुक्त मंगेश वानखेडे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, नायब तहसीलदार उज्ज्वला तेलमासरे, माध्यम कक्षाचे सहायक हंसराज राऊत उपस्थित होते. (प्रतिनिधी)