‘त्या’ संभाषणाचा कुणाशी संबंध?
By Admin | Updated: February 5, 2017 02:17 IST2017-02-05T02:17:04+5:302017-02-05T02:17:04+5:30
क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना कामठी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

‘त्या’ संभाषणाचा कुणाशी संबंध?
कामठीत चर्चेला उधाण : क्रिकेटवर सट्टा लावणारे दोघे अद्यापही पसार
कामठी : क्रिकेट सामन्यावर सट्टा लावणाऱ्या दोघांना कामठी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईलमध्ये वादग्रस्त संभाषण पोलिसांच्या हातात लागले आहे. त्यात नेमके काय आहे, कुणासोबत संभाषण झाले, पोलिसांनी अद्याप कारवाई का केली नाही, यासाठी कामठी पोलिसांचे हात ‘ओले’ तर झाले नाही ना अशा एक ना अनेक प्रश्नांवर कामठीकरांमध्ये जोरदार चर्चा आहे.
एहतेश्याम ऊर्फ येतू अब्दुल नबी (३२, रा. भाजीमंडी कामठी) व सट्टा लावणारा काँग्रेस नेता मनोज जगदीश शर्मा (४५, जुनी ओळ कामठी) या दोघांना कामठी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता जामिनावर सुटका करण्यात आली. दुसरीकडे सट्टा स्वीकारणारे इमरान व सुभाष दोघेही रा. नागपूर अद्याप फरार आहेत. भारत - इंग्लंड दरम्यान २८ जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान तीन टी टष्ट्वेन्टी क्रिकेट सामने खेळल्या गेले. या तिन्ही सामन्यांवर कामठी शहरात सट्टा लावण्यात व स्वीकारण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून एहतेश्याम याला ताब्यात घेतले. त्याच्या मोबाईल फोनची तपासणी केली. त्यातील काही मॅसेजेस व कॉलच्या आधारे मनोज शर्मा याने या सामन्यावर सट्टा लावल्याचे स्पष्ट झाल्याने गुरुवारी रात्री कामठी (जुनी) पोलीस ठाण्यात विचारपूस करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मनोज शर्माला अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारीच न्यायालयात हजर केले असता दोघांचीही जामिनावर सुटका करण्यात आली.
कामठीतील या क्रिकेट सट्टा प्रकरणाची सर्वत्र खमंग चर्चा केली जात आहे. या प्रकरणात आणखी एका काँग्रेस नेत्याचा सहभाग असल्याची माहिती आहे. मात्र पोलिसांनी ‘त्या’ नेत्याला अलिप्त ठेवण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळेच ‘त्या’ काँग्रेस नेत्याचे नाव कुठेही घेण्यात आलेले नाही. कामठीतील तो काँग्रेसचा बडा नेता कोण, याबाबतही कामठीच्या गल्लोगल्ली चर्चा रंगत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
कामठीच्या कोळसा टाल येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी काय कारवाई केली, या संदर्भात विचारणा करण्यासाठी एहतेश्याम हा कामठी (जुनी) पोलीस ठाण्यात गेला होता. याच मुद्यावरून त्याचा सहायक पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्याशी वाद उद्भवला होता. त्यामुळे त्याने या संदर्भात तक्रार करण्यासाठी पोलीस उपायुक्त अविनाशकुमार यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधला. त्याने अविनाशकुमार यांची भेट घेऊन त्याच्या मोबाईलमधील काही व्यावसायिकांचे अवैध धंद्यांबाबतचे संभाषण ऐकविले. अविनाशकुमार यांनी त्याच्या मोबाईलमधील एक जुनी ध्वनिफित ऐकली असता त्यातील आवाज हा एहतेश्याम याचा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर मनोज शर्मापर्यंत पोलिसांचे हात पोहोचले. याच संभाषणात काँग्रेसच्या एका बड्या नेत्याच्या सहभागाबाबतही शिक्कामोर्तब झालेले असताना ‘त्या’ नेत्याला दूर ठेवण्यात कामठी पोलीस धन्यता मानत आहे. त्यातच जुन्या कामठी पोलीस ठाण्याचे ठाणेदार जयेश भांडारकर हे काँग्रेस नेत्याचा सहभाग नाही असे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न करीत आहे. एवढेच काय तर ती केवळ एक अफवा असल्याचे सांगत आहे. त्यामुळे सट्टा प्रकरण खोटे की पोलिसांची कारवाई खोटी असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो. दुसरीकडे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
विशेष पथक तयार
क्रिकेट सट्टा प्रकरणात दोघांना अटक केली. त्यामध्ये मनोज शर्मा नामक काँग्रेस नेत्याचा समावेश असून त्यानंतर त्या दोघांचीही जामिनावर सुटकासुद्धा झाली. या प्रकरणाचे कनेक्शन मुंबईपर्यंत आहे. एवढेच काय तर अटक करण्यात आलेल्या नेता हा गोव्यातील बुकींच्याही संपर्कात असल्याची माहिती आहे. मुंबई आणि पुण्याच्या बुकींसाठी तो खायवाडी करीत असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली आहे. या प्रकरणात दोघे अद्याप पसार असून त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. ते पथक लवकरच त्या फरारींना अटक करणार आहे. त्यानंतर खरा प्रकार समोर येईल, अशी शक्यता आहे.