महिलांनी कुठे घ्यावा मोकळा श्वास?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:14 IST2021-02-06T04:14:31+5:302021-02-06T04:14:31+5:30
आया-बहिणींनी कुठे घ्यावा मोकळा श्वास? - शंकरनगर उद्यान परिसरातील नागरिक म्हणतात, आम्ही शुल्क देणार नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर ...

महिलांनी कुठे घ्यावा मोकळा श्वास?
आया-बहिणींनी कुठे घ्यावा मोकळा श्वास?
- शंकरनगर उद्यान परिसरातील नागरिक म्हणतात, आम्ही शुल्क देणार नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील उद्यानांच्या खाजगीकरणाचा व निवडक उद्यानांमध्ये प्रवेश शुल्काचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. अशा ६९ उद्यानांच्या खाजगीकरणाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे. मात्र, हा निर्णय नागरिकांच्या स्वायत्ततेवर घाला घालणारा असून, नागरिकांनी मोकळा श्वासही आता पैसे देऊनच मोजावा का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषत: ज्या महिला संध्याकाळच्या वेळी दिवसभराच्या कौटुंबिक जबाबदारीतून उसंत म्हणून उद्यानात प्रफुल्लित होण्यासाठी येतात, त्यांनीही घराबाहेर पडू नये का? एका अर्थाने मनपाचा हा निर्णय म्हणजे, महिलांनी चूल आणि मूलच सांभाळावे या पुरातन विचारसरणीचा पुरस्कार करण्यासारखे आहे, असा टोलाही नागरिकांकडून मारण्यात येत आहे. शुक्रवारी ‘लोकमत’च्या चमूने शंकरनगर उद्यानात दररोज विहारासाठी येणाऱ्या नागरिकांची मते मनपाच्या या निर्णयाबाबत जाणून घेतली असता, सर्वांनीच एकसुरात या निर्णयाचा निषेध नोंदविला. मनपा नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी विभिन्न तऱ्हेचे कर घेते. या करभरणीचा लाभ किती होतो, हे त्यांनाच ठाऊक. मात्र, जी लहान-मोठी उद्याने मनपा आणि बहुतकरून सर्वसामान्यांच्या डोनेशनमधून साकारली गेली आहेत, ती तरी नि:शुल्क असू द्या, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
ही काय मोगलाई आहे का
असे निर्णय नागरिकांच्या माथी मारणे म्हणजे, मोगलाईसारखेच वाटते. नागरिक आपल्या तणावातून मुक्त होण्यासाठी उद्यानरूपी हिरवळीत काही वेळ घालवितात. आता ते सुद्धा प्रशासनाला नको असल्यासारखे वाटते.
- शिरीष राजकारणे, नागरिक
आम्ही भरत असलेले कर कुठे जातो
मनपाकडे उद्यान विकासासाठी निधी नाही म्हणून उद्यानांचे खाजगीकरण करण्याचा घाट आहे. मग, नागरिकांना सुविधा देण्याच्या नावे आकारला जाणारा कर जातो कुठे, उद्यानांची जबाबदारीही शासनावर अवजड ठरते आहे, हे न पटण्यासारखे.
- श्रीकांत देशपांडे, नागरिक
फिटनेससाठी उद्याने महत्त्वाची
आमच्यासारख्या युवकांना फिटनेस सांभाळण्यासाठी ही छोटी उद्याने महत्त्वाची असतात. या उद्यानांनाही शुल्काचे ग्रह लागले तर आम्ही जायचे कुठे. मोकळा श्वास घेण्यासाठी ही उद्यानेच तेवढी शहरात आहेत. ती नागरिकांसाठी आरक्षित राहू द्यावी.
- हर्ष टरपे, विद्यार्थी
उद्याने तरी सोडा
जंगले दूरदूर नाहीत. अशा स्थितीत ही उद्यानांतच मोकळा श्वास घेता येतो. शहरातील पिकनिक स्पॉट असणाऱ्या उद्यानांतून खुशाल शुल्क आकारावे. मात्र, ही उद्याने तरी शुल्कमुक्त ठेवावीत.
- रश्मी खंडारे, सेवाक्षेत्र
मेंटेनन्ससाठी शुल्क आकारण्यास हरकत नाही
५ रुपये शुल्क, ही खूप मोठी रक्कम नाही. उद्यानाच्या मेंटेनन्ससाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. उद्यानांमध्ये अनेक समस्या आहेत. पाणी, स्वच्छता नाही. या निर्णयाने ते साकारले जाणार आहे.
- प्राची पितळे, गृहिणी
वृद्धांवर तरी मेहरबानी करावी
अनेक ज्येष्ठांना उत्पन्नाची साधने नाहीत, पेन्शन नाही, कसे तरी आपल्या आनंदासाठी ते उद्यानांत येतात. येथेही त्यांच्यावर शुल्काचे ओझे टाकाल तर कसे होईल. या निर्णयापासून ज्येष्ठांना तरी दूर ठेवावे.
- नामदेवराव मदनकर, ज्येष्ठ नागरिक
उद्यानात येणे सोडून द्यावे का
कुटुंबाला हातभार म्हणून लहान-मोठी कामे करण्यासाठी दूरवरून शंकरनगरात येतो. काम आटोपले की उद्यानात मोकळा श्वास घेतो आणि नंतर घराकडे परततो. आता यासाठीही शुल्क द्यावे लागत असेल तर उद्यानात येणे साेडून द्यावे लागेल.
- रेखा टोहोकार, सेवा क्षेत्र
रिलॅक्स होण्याचा अधिकारही काढून टाका
दिवसभराच्या कामाच्या ताणातून मुक्ती म्हणून उद्यानांत येते. आता त्यासाठीही ५ रुपये आकारले जातील तर काय म्हणावे. ही खूप मोठी रक्कम नसली तरी ज्याला दिवसा ५० रुपयांसाठी राबराब राबावे लागते, त्यांच्यासाठी ती मोठीच आहे.
- हेमलता हत्तीमारे, सेवाक्षेत्र
मग डोनेशन घेऊ नका
मनपाच्या उद्यानांचा विकास हा मुख्यत्त्वे धनाढ्य व नागरिकांच्या डोनेशनमधूनच होतो. ग्रीन जीम, योगा आदींसाठी सूज्ञ नागरिक पुढाकार घेतात. शुल्क घ्यायचे तर डोनेशन घेऊ नका आणि स्वत:च विकास करा. ते मात्र जमणार नाही. - मयुरी तिडके, मानसोपचारतज्ज्ञ
......