प्रवेशाचे ‘एसएमएस’ अडकले कुठे?
By Admin | Updated: April 24, 2015 02:09 IST2015-04-24T02:09:22+5:302015-04-24T02:09:22+5:30
‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असताना एक नवी अडचण पालकांसमोर निर्माण झाली आहे.

प्रवेशाचे ‘एसएमएस’ अडकले कुठे?
नागपूर : ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेचा अंतिम टप्पा सुरू असताना एक नवी अडचण पालकांसमोर निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात काढण्यात आलेल्या ‘आॅनलाईन’ सोडतीचा ‘एसएमएस’ अद्याप बऱ्याच पालकांना प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला की नाही याबाबत पालकांमध्ये संभ्रम आहे. शिवाय काही शाळांकडून प्रवेश देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. यासंदर्भात गुरुवारी नाराज पालकांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयाला धडक दिली व अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. सोबतच पटवर्धन शाळेच्या मागील बाजूस असलेल्या कार्यालयातदेखील संतप्त पालक गोळा झाले होते. १३ एप्रिल रोजी ‘आॅनलाईन’ सोडत काढण्यात आली होती. मुलांना नेमक्या कुठल्या शाळेत प्रवेश मिळाला आहे याची माहिती चार दिवसांनी ‘एसएमएस’वर कळविण्यात येईल, असे यावेळी शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. परंतु अनेक पालकांना आठवडा उलटूनदेखील ‘एसएमएस’ आलेले नाहीत. ज्या मुलांना पहिल्या फेरीदरम्यान शाळांमध्ये प्रवेश मिळालेले नाहीत, त्यांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा करावी लागेल, असे ‘एसएमएस’ अनेकांना आले आहेत. परंतु अशा प्रकारचेदेखील ‘एसएमएस’ आम्हाला का आले नाही, असा प्रश्न घेऊन अनेक पालक गुरुवारी अधिकाऱ्यांकडे पोहोचले. ‘ड्रॉ’ची माहिती इतक्या उशिरा का देण्यात आली, माहिती सार्वजनिक का करण्यात येत नाही याबाबत पालकांनी संतप्त स्वरात विचारणा केली.