कुठे आहे ‘डिजिटल’ भाजप?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:49 IST2017-10-22T01:49:00+5:302017-10-22T01:49:11+5:30

लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकांमध्ये विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केल्यानंतर पुढील निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे.

Where is the digital 'BJP'? | कुठे आहे ‘डिजिटल’ भाजप?

कुठे आहे ‘डिजिटल’ भाजप?

ठळक मुद्देशहर भाजपात दिव्याखालीच अंधार : जिल्ह्यापेक्षा शहर मागेच, साधे संकेतस्थळदेखील नाही

योगेश पांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणुकांमध्ये विजयाची ‘हॅट्ट्रिक’ केल्यानंतर पुढील निवडणुकांसाठी शहर भारतीय जनता पक्षाची तयारी सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘डिजिटल इंडिया’चा जोरात प्रचार-प्रसारदेखील सुरू आहे. मात्र राज्यपातळीपासून ते दिल्लीपर्यंतच्या नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असलेल्या शहर भाजपमध्ये प्रत्यक्षात दिव्याखालीच अंधार आहे. ‘डिजिटल प्लॅटफॉर्म’वर पक्ष काहीसा मागासलेलाच असून, शहर भाजपचे साधे संकेतस्थळदेखील तयार करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला नाही. दुसरीकडे ग्रामीण भागाचा समावेश असलेल्या नागपूर जिल्हा भाजपने याबाबतीत शहरावर बाजी मारल्याचे चित्र आहे.
पदाधिकारीच उदासीन
विधानसभा निवडणुकांच्या काळात ‘सोशल मीडिया’वर उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. नागपूर शहरातील विद्यमान आमदारांनीदेखील ‘आॅनलाईन’ प्रचारात आघाडी घेतली होती. मात्र केवळ ‘सोशल मीडिया’ वापरणे म्हणजेच तुम्ही ‘डिजिटल’ झाले असे होत नाही. पक्षाची ध्येयधोरणे, इतिहास, शहरातील आतापर्यंतची कामगिरी याची नेमकी व अचूक माहिती एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. याबाबतीत शहर कार्यकारिणीच्या जबाबदार पदाधिकाºयांची उदासीनता स्पष्टपणे दिसून येत आहे, असे मत कार्यकारिणीतीलच एका सदस्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केले.

२०१४ नंतर भाजपचे नेते, कार्यकर्ते ‘सोशल मीडिया’ तसेच इंटरनेटवरील इतर ‘प्लॅटफॉर्म’वर कमालीचे ‘अ‍ॅक्टिव्ह’ झाले आहेत. भाजपची राष्ट्रीय, प्रदेशपातळीवर स्वतंत्र संकेतस्थळे आहेत. या माध्यमातून पक्षाशी संबंधित विविध घडामोडी जगापर्यंत पोहोचविण्यात येतात. याशिवाय पक्षातील विविध आघाड्या, त्यांचे प्रमुख पदाधिकारी, विविध उपक्रम इत्यादींची इत्थंभूत माहितीदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनादेखील पदाधिकाºयांशी संपर्क साधणे सोपे जाते.
शहरात भाजपची आतापर्यंतची कामगिरी, सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांचे शहर म्हणून वाढलेले महत्त्व, आमदारांची फौज आणि पक्ष विस्ताराचे धोरण लक्षात घेता, पक्षाची सर्व माहिती एका ठिकाणी संकलित असणे अपेक्षित आहे.

मात्र शहर भाजपचे अधिकृत ‘टिष्ट्वटर हॅन्डल’देखील नसल्याचे चित्र आहे. संकेतस्थळ तयार करण्यासाठी पावले उचलण्यात आली होती. मात्र त्यानंतर हा प्रकल्प मागेच पडला. अद्यापपर्यंत हे संकेतस्थळ सुरूच झालेले नाही. आश्चर्याची बाब म्हणजे शहर भाजपमधील ‘सोशल मीडिया टीम’ सक्रिय असतानादेखील हे चित्र आहे. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी भाजपचे शहराध्यक्ष आ. सुधाकर कोहळे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

नेते सक्रिय, पक्षाचे काय?
‘सोशल मीडिया’वर शहर कार्यकारिणीतील अनेक पदाधिकारी सक्रिय आहेत. काही नेते तर दररोज काही ना काही ‘पोस्ट’ करताना दिसून येतात तर काही सदस्य मंत्र्यांसोबतची छायाचित्रे टाकण्यावर धन्यता मानतात. मात्र वैयक्तिकपणे सक्रियता दाखवीत असताना पक्ष म्हणून एकत्रितपणे ‘डिजिटल’ माध्यमातून जगापर्यंत पोहोचण्यासाठी पुढाकार घेण्याची तसदी घेण्याची आवश्यकता पडली नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
जिल्हा ‘अपडेट’ नाही
दुसरीकडे नागपूर जिल्हा भाजपतर्फे स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. या संकेतस्थळावर विविध पदाधिकारी, त्यांचा संपर्क, माहिती, पक्षाचा इतिहास इत्यादींची माहिती उपलब्ध आहे. मात्र पक्षाची ध्येयधोरणे, सध्या राबविण्यात येत असलेले उपक्रम याबाबतीत संकेतस्थळ ‘अपडेट’ नाही.

Web Title: Where is the digital 'BJP'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.