सतीश उके गेले तरी कुठे ?

By Admin | Updated: April 6, 2017 02:14 IST2017-04-06T02:14:51+5:302017-04-06T02:14:51+5:30

न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने कारावासाची शिक्षा झालेले वादग्रस्त वकील सतीश उके यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे.

Where did Satish get away? | सतीश उके गेले तरी कुठे ?

सतीश उके गेले तरी कुठे ?

वॉरंटची तामील नाही;शोधण्यात पोलिसांना अपयश : हायकोर्टाला पुन्हा मागितला वेळ
नागपूर : न्यायालयाच्या अवमानना प्रकरणात दोन महिने कारावासाची शिक्षा झालेले वादग्रस्त वकील सतीश उके यांना शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बजावलेला १० हजार रुपयांचा जामीनपात्र वॉरन्ट उके यांना तामील होऊ शकला नाही. यासाठी पोलिसांनी न्यायालयाला बुधवारी पुन्हा तीन आठवड्यांचा वेळ मागून घेतला.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. पोलिसांनी स्वत:ची बाजू स्पष्ट करताना उके यांचा शोध घेण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचे सांगितले. उके यांच्या नातेवाईकांना विचारपूस केली असता कोणीही ठोस माहिती दिली नाही. परिणामी उके यांना शोधण्यासाठी आणखी वेळ देण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली. न्यायालयाने त्यांची विनंती मान्य केली.न्यायमूर्ती, सरकारी वकील व न्यायालयीन अधिकारी यांच्याविरुद्ध विनाकारण अवमानजनक आरोप केल्यामुळे उके यांच्याविरुद्ध उच्च न्यायालयाने स्वत:हून दोन फौजदारी अवमानना याचिका दाखल करून घेतल्या आहेत. त्यापैकी एका प्रकरणात दोष सिद्ध झाल्यामुळे न्यायमूर्तीद्वय प्रसन्न वराळे व झेड. ए. हक यांच्या विशेष न्यायपीठाने २८ फेब्रुवारी २०१७ रोजी उके यांना दोन महिने साधा कारावास व दोन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त साधा करावास, अशी शिक्षा सुनावली आहे. परंतु उके त्यापूर्वीपासूनच अज्ञात ठिकाणी लपून बसले आहेत. त्यामुळे या निर्णयाची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही.
दुसऱ्या प्रकरणात पुरेसा वेळ देऊनही न्यायालयात गैरहजर राहिल्यामुळे उके यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरन्ट जारी करण्यात आला आहे. शासनातर्फे अतिरिक्त अभियोक्ता केतकी जोशी यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)
 

Web Title: Where did Satish get away?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.