विविध चर्चांना उधाण : शैक्षणिक अधिवेशनाला शिक्षणाशी संबंधित मंत्र्यांची अनुपस्थिती योगेश पांडे नागपूरअखिल भारतीय राष्ट्रीय शिक्षण महासंघाच्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनास रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात शुक्रवारपासून सुरुवात झाली. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित या अधिवेशनात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी तसेच राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी येण्याचे कबूल केले होते. परंतु ऐनवेळी दोघेही या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले. आश्चर्याची बाब म्हणजे निमंत्रण पत्रिकेत नाव असूनदेखील अनुपस्थित राहण्याचा प्रकार स्मृती इराणी यांच्या बाबतीत एका महिन्याच्या कालावधीत दोन वेळा घडला आहे.‘व्हीएनआयटी’च्या संचालक परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित विश्राम जामदार यांची निवड झाल्यानंतर स्मृती इराणी यांच्यावर जोरदार टीका झाली होती. कालांतराने हा वाद शांत झाला होता, परंतु इराणी यांच्या कार्यप्रणालीबाबत संघाचे शीर्षस्थ पदाधिकारी फारसे समाधानी नव्हते. जुलै महिन्यात महाराष्ट्रातील पहिल्या ‘आयआयएम’ची सुरुवात ‘व्हीएनआयटी’च्याच ‘कॅम्पस’मध्ये झाली. या कार्यक्रमाला त्या येणे अपेक्षित होते. परंतु त्यांची वेळ मिळू शकली नसल्याने त्यांचे नाव निमंत्रण पत्रिकेतच टाकण्यात आले नाही. त्यानंतर २६ आॅगस्ट रोजी इराणी यांनी अतिशय गुप्तपणे संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. महत्त्वाचे म्हणजे केंद्रीय मंत्री असूनही कोणताही लवाजमा सोबत न घेता अतिशय गुपचूपपणे इराणी नागपूरला आल्या होत्या. १५ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या उपस्थितीत ‘व्हीएनआयटी’चा १३ वा दीक्षांत समारंभ पार पडला. यावेळी राज्यपाल सी.विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती होती. परंतु निमंत्रण पत्रिकेत नाव असूनदेखील स्मृती इराणी अनुपस्थितच राहिल्या. त्यांच्या अनुपस्थितीचे कारण स्पष्ट करण्यात आले नव्हते.शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतदेखील स्मृती इराणी या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार होत्या. त्यांनी तसा होकारदेखील दिला होता. परंतु सकाळी ९ वाजता आयोजकांना त्या येणार नसल्याची माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली. त्यांच्या न येण्याचे कुठलेही कारण सांगण्यात आले नाही. इराणी यांच्या नागपूरमध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना न येण्यामागे नेमके काय कारण आहे याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याच्या तयारीत विनोद तावडे हे व्यस्त असल्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्मृती इराणींचा दौरा अडला कुठे?
By admin | Updated: October 10, 2015 03:11 IST