विद्यापीठात विकासात्मक अभ्यासक्रम आहेत कुठे?

By Admin | Updated: June 28, 2015 03:03 IST2015-06-28T03:03:13+5:302015-06-28T03:03:13+5:30

‘मिहान’, ‘टेक्सटाईल पार्क’ इत्यादींच्या माध्यमातून नागपूर व विदर्भाला विकासाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Where are the developmental courses in the university? | विद्यापीठात विकासात्मक अभ्यासक्रम आहेत कुठे?

विद्यापीठात विकासात्मक अभ्यासक्रम आहेत कुठे?

नितीन गडकरींचा सवाल : ‘वायसीसीई’चा पहिला दीक्षांत समारंभ साजरा
नागपूर : ‘मिहान’, ‘टेक्सटाईल पार्क’ इत्यादींच्या माध्यमातून नागपूर व विदर्भाला विकासाकडे नेण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या माध्यमातून स्थानिक तरुणांना रोजगार मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. परंतु येथे येऊ घातलेल्या उद्योगांसाठी पूरक असे अभ्यासक्रमच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नाहीत असे प्रतिपादन करत केंद्रीय भूपृष्ठवाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी विद्यापीठाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘वायसीसीई’च्या (यशवंतराव चव्हाण कॉलेज आॅफ इंजिनिअरींग) पहिल्या दीक्षांत समारंभाप्रसंगी ते बोलत होते.
वानाडोंगरी येथील दत्ता मेघे आॅडिटोरियम येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे, ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल, अभियांत्रिकी शाखेचे अधिष्ठाता डॉ.रवींद्र क्षीरसागर, ‘वायसीसीई’च्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष दत्ता मेघे, आ.समीर मेघे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शैक्षणिक संस्था व उद्योग जगत यांच्यातील दरी दूर होण्याची आवश्यकता आहे. नागपुरात एअर इंडिया ‘एमआरओ’, मिहान यामुळे रोजगाराच्या संधी आहेत. अमरावतीमध्ये ‘टेक्सटाईल पार्क’ सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु विद्यापीठात ‘टेक्सटाईल इंजिनीअरिंग’ व ‘एव्हिएशन इंजिनीअरिंग’सारख्या शाखाच नाही. अशा स्थितीत येथील विद्यार्थ्यांना रोजगार कसा मिळणार असा प्रश्न उपस्थित करत असे अभ्यासक्रम सुरू करण्याची सूचना कुलगुरूंना केली. समित्यांवर आधारित प्रशासन विकासाचा वेग कमी करते. विद्यापीठात समित्या खूप आहेत, पण त्यातून बाहेर काही येत नाही. ‘खाया पिया कुछ नही’ अशासारखा हा प्रकार असल्याचा चिमटादेखील त्यांनी यावेळी काढला.
भविष्यातील आव्हाने लक्षात घेऊन तरुण अभियंत्यांनी संशोधनावर भर देऊन कमी किमतीत दर्जा कसा वाढेल यावर भर दिला पाहिजे असा सल्लादेखील गडकरी यांनी यावेळी दिला.
जागतिकीकरणाच्या या युगात नवनवीन कल्पनांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज असल्याचे मत डॉ.काणे यांनी व्यक्त केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.यु.पी.वाघे यांनी प्रास्ताविक केले.(प्रतिनिधी)

Web Title: Where are the developmental courses in the university?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.