सुमेध वाघमारे ल्ल नागपूर गेल्या अनेक वर्षांतील सरकारी अनास्थेमुळे नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांची हेळसांड होत आहे. तुरु ंगातील कैद्यांपेक्षाही इथल्या रुग्णांची अवस्था दयनीय आहे. लालफितीची मनमानी, अपुरा निधी, औषधांचा तुटवडा, वर्ग-१च्या मानसोपचार तज्ज्ञाचा अभाव, मानसोपचार परिचारिका व अटेन्डन्टची अल्प संख्या, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे इथल्या कारभाराचा बोजवारा उडाला आहे. हिवाळ्याच्या दिवसातही मनोरुग्णांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत असल्याचे धक्कादायक चित्र आहे. मनोरुग्णांवर योग्य औषधोपचार करून त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता यावे यासाठी इंग्रजांनी महाराष्ट्रात चार मनोरुग्णालयाची स्थापना केली. मात्र, शासनाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. दररोजच्या ताणतणावामुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. नागपूरच्या प्रादेशिक रुग्णालयात मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, आंध प्रदेशासह विदर्भातून रुग्ण येतात. मात्र, आजही जुन्याच पद्धतीचे उपचार व औषधांचा वापर सुरू आहे. वेड्यांकडे काय लक्ष द्यायचे, अशा भावनेतूनच या खात्याचे काम सुरू असल्याचे रुग्णालयाच्या अनागोंदी कारभारावरून दिसून येत आहे. रुग्णांची थंड पाण्याने आंघोळ ४मनोरुग्णांना आंघोळीसाठी गरम पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्चून पाच वर्षांपूर्वी सोलर सिस्टिम लावण्यात आली. पुण्याच्या एका कंपनीकडे ही जबाबदारी दिली. परंतु नंतर त्याच्या देखभालीकडे लक्षच दिले नाही. मागील तीन वर्षांपासून आठ सोलरपैकी फक्त दोनच सुरू आहे. त्यातही गरम पाणी मिळेनासे झाले आहे. रुग्णालय प्रशासनाकडून लाकडे जाळून गरम पाणी केले जाते, परंतु रुग्णांची संख्या पाहता सर्वांनाच पाणी मिळणे कठीण होते. यामुळे थंडीतही अनेकांना थंड पाण्याने आंघोळ करावी लागत आहे. ४सूत्रानुसार, जे रुग्ण थंड पाण्याने आंघोळीसाठी नकार देतात, त्यांना काही कर्मचारी मारहाण करतात. त्यांच्या अंगावर थंड पाणी टाकतात. रुग्णासोबत हा अमानवीय व्यवहार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. या प्रकारामुळे आजार बरा होण्यापेक्षा तो वाढत असल्याचेही सूत्राचे म्हणणे आहे.
कधी मिळेल माणुसकीचा स्पर्श
By admin | Updated: November 15, 2016 02:19 IST