कधी थांबणार कुचंबणा
By Admin | Updated: December 3, 2014 00:39 IST2014-12-03T00:39:16+5:302014-12-03T00:39:16+5:30
नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे राजकीय जत्राच! सरकारसोबतच राज्यभरातील नेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते उपराजधानीत गर्दी करतात. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे,

कधी थांबणार कुचंबणा
पोलिसांना हव्या सुविधा : प्रशासनाकडून अपेक्षा
नागपूर : नागपूरचे हिवाळी अधिवेशन म्हणजे राजकीय जत्राच! सरकारसोबतच राज्यभरातील नेते, विविध पक्षांचे कार्यकर्ते उपराजधानीत गर्दी करतात. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी धरणे, निदर्शने केली जातात. मोर्चेही धडकतात. त्यासाठी ठिकठिकाणाहून मोठ्या संख्येत आंदोलक नागपुरात येतात. त्यांना थोपवून धरणे, नेत्यांची सुरक्षा सांभाळणे आणि अधिवेशनाच्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये म्हणून बंदोबस्तासाठी मोठा पोलीस ताफा नागपुरात बोलवून घेण्यात येतो. मात्र, ही महत्त्वाची जबाबदारी पेलणाऱ्या पोलिसांची दरवर्षी मोठी कुचंबणा होते. शिस्तीचे दल असल्यामुळे या कुचंबणेविरोधात चकार शब्दही काढायला जमत नाही. प्रसार माध्यमांकडून पोलिसांची होणारी कोंडी अधोरेखित केली गेल्यानंतर राज्यकर्ते ‘यापुढे असे होणार नाही‘असे म्हणत, वेळ मारून नेतात. त्यामुळे आता यंदाच्या अधिवेशनात कसे आणि काय होणार, अशी भीतीयुक्त चर्चा पोलिसात केली जात आहे.
सारीच मारामार
कडाक्याच्या थंडीत पार पडणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून साधारणत: चार ते पाच हजार पोलीस नागपुरात पोहचतात. दोन-तीन गणवेष, आंघोळीचे कपडे आणि असेच काहीसे आवश्यक साहित्य घेऊन हे बिचारे कर्तव्यावर येतात. कुणाची ड्युटी कुठे लावली जाईल, याची त्यांना कल्पना नसते. सोबतीला कोण आणि कुठले सहकारी असणार त्याचीही माहिती नसते आणि मुक्कामाची सोय कुठे केली असेल ते पण माहीत नसते.
बाहेरून आलेल्या पोलिसांची निवासाची व्यवस्था शहर आणि ग्रामीण मुख्यालय तसेच उपराजधानीतील विविध भागातील सभागृहात (हॉल) केली जाते. सकाळी ७ वाजता अमूक एका पॉर्इंटवर पोलिसांना पोहचायचे असते. एका निवासस्थळी साधारणत: १०० पोलिसांची व्यवस्था असते. सकाळी ७ वाजता त्यांना कर्तव्यावर हजर व्हायचे म्हटले की ६.४५ ला तयार असावे लागणार. येथेच गणित गडबडते. एका व्यक्तीला तयार होण्यासाठी किमान १० मिनिटे लागणार. मोजकेच टॉयलेट, बाथरूम असल्याने सर्वांना तयार होणे शक्यच होत नाही. त्यामुळे अनेक कर्मचारी तोंडावर पाणी मारूनच वाहनात बसतात आणि ठराविक ठिकाणी कर्तव्यावर हजर होतात.
सकाळी फ्रेश न झाल्यामुळे अख्खा दिवसच ते अस्वस्थतेत काढतात. किमान १५ दिवसांची बंदोबस्त ड्युटी अशीच काहीशी अस्वस्थेत जाते. त्यामुळे अनेक पोलिसांची प्रकृती बिघडते. अनेकांना नको ते त्रास होतात. (प्रतिनिधी)
जेवणाचेही वांधे
अधिवेशनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या जेवणाचेही दरवर्षीच वांधे असतात. अर्धकच्ची भाजी अन् पोळ्या (पुऱ्या) या बिचाऱ्यांना दिल्या जातात. गेल्यावर्षी (सन-२०१३) पोलिसांना देण्यात आलेले जेवण तर प्रसार माध्यमांच्या बातम्यांचे विषय ठरले होते. यामुळे नागपूर पोलीस दलाच्या वरिष्ठांना टीका झेलावी लागली होती. त्यामुळे यंदा तसे होणार नाही आणि गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली पोलिसांची कुचंबणा थांबेल, अशी अपेक्षा आहे.
महिला कर्मचाऱ्यांची जास्त कुचंबणा
या अधिवेशनात सर्वाधिक कुचंबणा महिला पोलिसांची होते. दिवसभराच्या आवश्यक नैसर्गिक गरजा पुरुष कर्मचारी कशाबशा भागवून घेतात. महिलांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागतो. दोन वर्षांपूर्वी लोकमतने हा विषय लावून धरला होता. त्यावेळी गृहमंत्र्यांनी बंदोबस्तासाठी असलेल्या महिलांसाठी बंदोबस्ताच्या ठिकाणी टॉयलेटची व्यवस्था करण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही. यंदाचे नवे सरकार महिला पोलिसांच्या ‘आवश्यक सुविधांचा कसा बंदोबस्त करते’ ते पाहावे लागणार आहे.
सीपीसाहेब, बस्स एवढे करा...
गेल्या वर्षीच्या बंदोबस्तात छोट्याशा कापडी तंबूत, खाली चटई टाकून चक्क मुंग्यात झोपले होते. यावेळी तसे होऊ नये. किमान त्यांना झोपण्यासाठी अंथरुण, पांघरुणाची चांगली व्यवस्था करा. तयार होण्यासाठी तात्पुरत्या संडास बाथरूमची व्यवस्था करा. कडाक्याच्या थंडीत पहाटे उठून थंड्या पाण्याने आंघोळ करणे शक्य नाही. त्यामुळे गरम पाण्याची व्यवस्था करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, नाश्ता मिळाला नाही तरी चालेल. वेळेवर नीट शिजलेले अन्न बंदोबस्तावरील पोलिसांना द्या. आपले घर, गाव सोडून ते येथे कर्तव्यावर येतात. त्यामुळे त्यांची किमान काळजी घेणे, आमचे कर्तव्य ठरते.