भुदान मध्ये ‘विकास’ कधी पोहचणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:10 IST2021-02-13T04:10:53+5:302021-02-13T04:10:53+5:30

शरद मिरे भिवापूर : शहर ‘स्वच्छ’ पण शहरातील दलित वस्ती ‘गलिच्छ’ असेच काहीसे विदारक वास्तव भूदान या १०० कुटुंबाच्या ...

When will 'Vikas' reach Bhudan? | भुदान मध्ये ‘विकास’ कधी पोहचणार?

भुदान मध्ये ‘विकास’ कधी पोहचणार?

शरद मिरे

भिवापूर : शहर ‘स्वच्छ’ पण शहरातील दलित वस्ती ‘गलिच्छ’ असेच काहीसे विदारक वास्तव भूदान या १०० कुटुंबाच्या प्रभागातील आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षित कारभारामुळे प्रभाग क्र. २ चा भाग असलेल्या भूदान मध्ये ‘विकास’ कधी पोहचणार, असा सवाल येथील नागरिक विचारत आहे.

भिवापूर शहरापासून ३ किमी अंतरावर भूदान हे गाव असून नगरपंचायत अंतर्गत प्रभाग क्र. २ मध्ये या गावाचा समावेश आहे. १०० कुटुंबे येथे मुक्कामी आहे. येथे पिण्याचे शुध्द पाणी, सांडपाणी वाहून जाण्याकरीता भूमिगत नाल्या, स्वच्छतेचे पुरते बारा वाजले आहे. महत्वाचे म्हणजे गावात जाणारा रस्ता सुध्दा धड नाही. नागरी सुविधांच्या समस्या येथे पाचवीला पुजल्या आहे. तत्कालीन आ. सुधीर पारवे यांनी निधीतून भिवापूर ते भूदान रस्ता डांबरीकरणासाठी दोन टप्प्यात निधी उपलब्ध करून दिला. यातून भूदानच्या अर्ध्यावर पर्यंत डांबरीकरण झाले. मात्र निधी अभावी उर्वरित १,२०० मीटरचे डांबरीकरण गत दोन ते तीन वषार्पासून रखडले आहे. ते पूर्ण करण्यासाठी इतर कुणीही पुढाकार घेतला नाही, असा आरोप दिनेश रामटेके यांनी केला. भूदान हा शहराचाच भाग असल्यामुळे येथील विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थ छोट्या-मोठ्या कामासाठी दररोज भिवापूरला येतात. मात्र रस्त्याचे हाल बेहाल असल्यामुळे त्यांना उखडलेल्या रस्त्यावरून खडतर प्रवास करावा लागतो. त्यामुळे उर्वरित १,२०० मीटरचे शिल्लक डांबरीकरण तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी दिनेश रामटेके, माणिक रामटेके, रवींद्र वारकर, बबन येवले, सुरेश येवले, अमोल मेश्राम यांनी केली आहे.

डझनावर निवेदने

उर्वरित रस्ता तात्काळ पूर्ण करावा. यासाठी दिनेश रामटेके यांच्यासह प्रभागातील नागरिकांनी आ. राजू पारवे यांच्यासह नगर पंचायत प्रशासन, नगरसेवकांना अनेकदा निवेदने दिलीत. मात्र भूदान गावात डांबरीकरण तर सोडाच ‘विकास’ पोहचलाच नाही. पुढे होऊ घातलेल्या नगर पंचायत निवडणुकीत या प्रभागातील नागरिकांनी 'विकास' कुठाय? असा प्रश्न विचारल्यास नवल वाटू नये.

लेंगडीच्या नाल्यावर पूल कधी?

येथील बहुतांश नागरिक शेती व मजुरीच्या निमित्ताने भिवापूर-आंभोरा मार्गाचा वापर करतात. यामार्गावर एक नाला असून त्यावर छोटेखानी पायऱ्यांचा पुल (रपटा) तयार केला आहे. दरम्यान पावसाळ्यात लगतचा म्हशाडोंगरी तलाव ‘ओव्हर फ्लो’ होऊन हा छोटेखानी पूल पाण्याखाली येतो. अशात नागरिकांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे या पुलाची उंची वाढविण्याची मागणी सुध्दा ग्रामस्थांनी केली आहे.

सुसज्ज स्मशानभूमी कधी?

शहरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या मात्र शहराचाच भाग असलेल्या भूदान मध्ये सुसज्ज स्मशानभूमीची आवश्यकता आहे. स्मशानभुमी नसल्यामुळे येथे खुल्या किंवा जंगलव्याप्त भागात मृतावर अंत्यसंस्कार करावे लागतात.

नागरिकांनीच घेतला पुढाकार

डांबरीकरणात शिल्लक असलेला १२०० मीटरचा रस्ता पूर्णता उखडला आहे. गिट्टी उखडल्याने सायकल, दुचाकी व चारचाकी वाहने पंक्चर होतात. त्यामुळे येथील नागरिकांनी एकत्र येत श्रमदान करून रस्त्यावर उखडलेली गिट्टी बाजूला केली.

Web Title: When will 'Vikas' reach Bhudan?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.