‘त्या’ वाघांचा वनवास कधी संपणार?
By Admin | Updated: July 8, 2014 01:20 IST2014-07-08T01:20:42+5:302014-07-08T01:20:42+5:30
गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे.

‘त्या’ वाघांचा वनवास कधी संपणार?
पेंचच्या एन्क्लोजरमध्ये कै द : वन विभाग ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत
नागपूर : गत पाच वर्षांपासून वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद भोगत असलेल्या ‘त्या’ वाघांच्या सुटकेची तयारी पूर्ण झाली आहे. मात्र केवळ ‘रेडिओ कॉलर’च्या प्रतीक्षेत ‘त्या’ वाघांना पिंजऱ्यात कैद भोगावी लागत आहे. दुसरीकडे शेवटी या निरपराध वाघांचा वनवास कधी संपणार? असा वन्यजीवप्रेमी प्रश्न उपस्थित करू लागले आहेत.
विशेष म्हणजे, या एन्क्लोजरमधील तिन्ही वाघांची फारच रोमांचक हकीकत आहे. सुमारे पाच वर्षांपूर्वी तिन्ही बछडे आपल्या आईपासून जंगलात भटकले होते. यानंतर वन अधिकाऱ्यांनी या बछड्यांना आपल्या ताब्यात घेऊन सुरुवातीला त्यांना बोर अभयारण्यातील पिंजऱ्यात ठेवण्यात आले. येथे त्यांनी सुमारे तीन वर्षे कैद भोगली.
यानंतर त्यांना पेंचमधील एन्क्लोजरमध्ये स्थलांतरित करण्यात आले. येथे ते गत दोन वर्षांपासून राहात असून, आता ते सुमारे पाच वर्षांचे झाले आहेत. माहिती सूत्रानुसार, गत काही दिवसांपूर्वी पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांनी पुढाकार घेऊन त्यांना जंगलात सोडण्यासंबंधी हालचाली सुरू केल्या.
तिघांपैकी दोन वाघिणींना रेडिओ कॉलर लावून पेंचच्या जंगलात सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला; शिवाय ‘रेडिओ कॉलर’चा आॅर्डरही देण्यात आला. मात्र गत सहा महिन्यांपासून रेडिओ कॉलर वन विभागापर्यंत पोहोचलेली नाही.
यासंबंधी मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एम. एस. रेड्डी यांच्याशी चर्चा केली असता, त्यांनी केवळ रेडिओ कॉलरसाठी विलंब होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, रेडिओ कॉलर विदेशातून मागणी करावी लागत असून, त्यासाठी वन विभागाने संबंधित संस्थेला आॅर्डर दिली आहे.
त्यानुसार रेडिओ कॉलर पोहोचताच, वाघांची सुटका केली जाईल. (प्रतिनिधी)