माैदा टी-पाॅईंटवर उड्डाणपूल हाेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:08 IST2021-03-17T04:08:33+5:302021-03-17T04:08:33+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मौदा : नागपूर व भंडारा याला जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर माैदा शहर आहे. तालुक्याचे ...

माैदा टी-पाॅईंटवर उड्डाणपूल हाेणार कधी?
लाेकमत न्यूज नेटवर्क
मौदा : नागपूर व भंडारा याला जाेडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वर माैदा शहर आहे. तालुक्याचे ठिकाण असलेल्या माैद्याची औद्याेगिक शहराकडे वाटचाल सुरू आहे. परिणामी याठिकाणी हजाराे नागरिकांची ये-जा असते. शहरालगतच्या महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. परंतु माैदा रबडीवाला टी-पाॅईंटवर उड्डाणपूल नसल्याने जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल हाेणार कधी, असा सवाल नागरिक विचारत आहेत.
या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या चाैपदरीकरणाचे काम हाेऊन नऊ वर्षांचा काळ उलटला. विशेषत: मार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामादरम्यान उड्डाणपूल हाेणे गरजेचे हाेते. त्यावेळी नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुरू असताना विविध संघटनांनी आंदाेलने केली. प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदाेलनस्थळी भेट देऊन लेखी आश्वासने दिली हाेती. परंतु त्यानंतर या मागणीसाठी नेमके कुठे पाणी मुरले, हे कळायला मार्ग नाही.
यामध्ये स्थानिक राजकारण आड आल्याचेही नागरिकात बाेलले जात आहे. राष्ट्रीय महामार्गावरील रबडीवाला टी-पाॅईंट परिसरात परमात्मा एक आश्रम आहे. लगतच दाेन पेट्राेल पंप, नागपूर-भंडारा व रामटेककडून येणारा मार्गही येथे जाेडला जाताे. त्यामुळे याठिकाणी जड वाहतुकीसह विविध वाहने एकत्र येतात. शिवाय, टी-पाॅईंटलगत कुही तालुक्यातील गाेसेखुर्द प्रकल्पग्रस्त चिचघाट गावाचे पुनर्वसन झाले आहे. या गावातील नागरिकांसह विद्यार्थी दरराेज माैदा येथे ये-जा करतात. दुसरीकडे परमात्मा आश्रमात येणाऱ्या सेवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे टी-पाॅईंट परिसरात नागरिकांचा सतत वावर असताे. याच ठिकाणी धाेकादायक वळण असल्याने टी-पाईंट येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी डाेकेदुखी ठरत आहे. त्यामुळे येथे उड्डाणपूल हाेणे नितांत गरजेचे झाले आहे.
....
अपघाताचे सत्र सुरूच
याठिकाणी महिनाभरात तीन-चार अपघात नित्याची बाब झाली असून, अपघाताचे सत्र सुरूच आहे. मार्गाच्या चाैपदरीकरणानंतर वाहने सुसाट धावतात. असे असतानाही शासन, प्रशासनाने येथे उपाययाेजनांसाठी काेणतीही पावले उचलली नाही. २०१६-१७ मध्ये याठिकाणी उड्डाणपूल साकारणार, या चर्चेला उधाण आले हाेते. परंतु त्यानंतर चर्चाही हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. अपघाताचे वाढते प्रमाण तसेच याठिकाणची वर्दळ पाहता येथे उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.