तोडगा केव्हा निघणार ?

By Admin | Updated: July 17, 2014 01:09 IST2014-07-17T01:09:46+5:302014-07-17T01:09:46+5:30

शहरातील काही विशिष्ट भाग, वस्त्या अशा आहेत जिथे पावसाचे नेहमीच पाणी साचते. वस्त्यांमध्ये लोकांच्या घरी पाणी शिरते. झोपडपट्टी असो की उच्चभ्रू लोकांची वस्ती, सर्वत्र सारखीच समस्या आहे.

When will the solution go out? | तोडगा केव्हा निघणार ?

तोडगा केव्हा निघणार ?

प्रशासनाच्या तयारीचे तीनतेरा : पहिल्याच पावसात पितळ उघडे
नागपूर : शहरातील काही विशिष्ट भाग, वस्त्या अशा आहेत जिथे पावसाचे नेहमीच पाणी साचते. वस्त्यांमध्ये लोकांच्या घरी पाणी शिरते. झोपडपट्टी असो की उच्चभ्रू लोकांची वस्ती, सर्वत्र सारखीच समस्या आहे. वस्त्यांमध्ये पाणी साचण्याची ही समस्या कित्येक वर्षांपासून कायम आहे. परंतु यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेले नाही. यंदाही चित्र वेगळे नाही. शहरात पाऊस उशिरा पडला. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी करावयाच्या उपाययोजनेसाठी प्रशासनाला भरपूर वेळ मिळाला होता. प्रशासनाने तसा दावाही केला होता. परंतु मंगळवारी झालेल्या पहिल्याच संततधार पावसाने महापालिका प्रशासनाच्या तयारीचे पितळ उघडे पाडले आहे. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार तरी केव्हा, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)
कचऱ्याची दुर्गंधी, नागरिक हैराण
गोपालनगर, अंबाझरीच्या पायथ्याचा भाग, प्रतापनगर, खामला, सोमलवाडा येथे पावसाच्या पाण्यामुळे अनेक उकिरड्यांवरील कचरा वाहून रस्त्यांवर आला. शिवाय अनेक ठिकाणी खोदकाम सुरू असल्यामुळे रस्त्यांवरच चिखल जमा झाला आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये कचऱ्याचा दुर्गध पसरला होता. शिवाय गडर लाईनदेखील ‘चोक’ झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या.
मोरभवन परिसरात खड्डे
शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या सीताबर्डी परिसरातील प्रत्येक चौकाला पावसाळ्यात तलावाचे स्वरूप येते. व्हेरायटी चौक, झाशी राणी चौक, पंचशील चौक, मोरभवन परिसरात नेहमीच पाणी साचून राहते. मोरभवन येथील बसस्थानक परिसरात तर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचून असल्याने प्रवाशांसह सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. या खड्ड्यांमधून बस गेल्यावर खड्ड्यातील साचलेले पाणी नागरिकांच्या अंगावर उडत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
वैशालीनगरचा अर्धवट स्वीमिंग पूल
वैशालीनगर येथे नागपूर सुधार प्रन्यासतर्फे लाखो रुपये खर्चून स्वीमिंग पूल बांधण्यात आला आहे. परंतु हा पूल अजूनही अर्धवट आहे. काम बंद असून त्याला चारही बाजूंनी संरक्षित करून ठेवण्यात आले आहे. परंतु मंगळवारच्या पावसामुळे हे टाके पूर्णत: भरले आहे. संरक्षण भिंत असली तरी लहान मुलांच्या दृष्टीने धोका आहेच. परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये राहणारेप्राध्यापक डॉ. विनोद डोंगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार येथील स्विमिंग पूल हे नागरिकांसाठी डोकेदुखी ठरले आहे. मागील ४ वर्षांपासून हे स्वीमिंग पूल याच अवस्थेत आहे. पूर्वी याला संरक्षण भिंतही नव्हती. त्यामुळे मुले बुडण्याचा धोका राहायचा. नागरिकांच्या तक्रारींमुळे प्रशासनाने चारही बाजूंनी हा पुल संरक्षित केला आहे. मात्र परिसरातील नागरिकांना आता दुसऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पाणी साचल्याने परिसरात डासांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जरीपटक्यातील वस्त्यांत पाणीच पाणी
जरीपटक्यातील सीएमपीडीआय रोड के.सी. बजाज कॉलेजजवळील रेल्वे लाईनला लागून असलेल्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले. रेल्वे परिसरातून निघणाऱ्या नाल्याची स्वच्छता झाली नसल्याने नाल्याचे पाणी घरांमधून शिरले असल्याची नागरिकांची तक्रार आहे. परिसरातील देवा माने, बबलू यादव, विनोद साळवे आणि गणेश चांदेकर यांच्या घरात गुडघाभर पाणी साचले होते. घरातील साहित्य पाण्यात भिजले. गेल्या वर्षी सुद्धा अशीच स्थिती उद्भवली होती. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. परिसरातील नाल्याची स्वच्छता झाली असती तर पाणी नाल्याद्वारे वाहून गेले असते, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
बाराखोली वरपाखड येथे नाल्याची समस्या
उत्तर नागपुरातील बाराखोली वरपाखड, मिसाळ ले-आऊट, ठवरे कॉलनी, श्रावस्तीनगर या वस्त्यांमध्ये पावसाळ्यातील पाणी ही नेहमीचीच समस्या झाली आहे. वडपाखर परिसरातून एक नाला वाहतो. उत्तर नागपुरातील आतील अनेक वस्त्यांमधून हा नाला वाहतो. हा नाला कधीच स्वच्छ करण्यात आलेला नाही. परिणामी दिवसभर संततधार पाऊस आला तरी या नाल्याला पूर येतो. मंगळवारीसुद्धा तीच परिस्थिती निर्माण झाल्याचे परिसरातील भीमराव वैद्य यांनी सांगितले. महापालिका प्रशासन नाला सफाईच्या मोठ्या गोष्टी करीत असते. परंतु केवळ नाग नदी स्वच्छ करून होणार नाही. तर शहरातील अंतर्गत नालेसुद्धा स्वच्छ करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
भोलेश्वरनगरात चिखल
प्रभाग ३४ भारतनगर परिसरातील भोलेश्वरनगर, दुर्गानगर, बेनालनगर, गजानननगर आदी वस्त्यांमध्ये मंगळवारच्या पावसाने अनेक समस्या निर्माण केल्या आहेत. सर्वत्र चिखल पसरला आहे. अगोदरच या वस्त्यांमध्ये विजेची आणि रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या कायम आहे. अशा स्थितीत पावसाने येथील नागरिकांच्या अडचणी आणखी वाढविल्या आहेत. या सर्व समस्यांना घेऊन मनसेचे पवन शाहू यांच्या नेतृत्त्वात नागरिकांनी नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. परंतु काहीच कारवाई झाली नाही. त्यामुळे याकडे मनपा व नासुप्र प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील ओम प्रकाश, राजेश बागडे, रियाज शेख, छाया भिसीकर, सौरभ पटेल आदी नागरिकांनी केली आहे.
झिंगाबाई टाकळीतील घरांसह दुकानातही पाणी
राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान मानकापूर परिसरातील दोन्ही बाजूंनी रस्ता वाढविण्यात आला. दरम्यान, झिंगाबाई टाकळीला जाणाऱ्या रस्त्यावरील प्रवेशद्वारही तोडण्यात आले. रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाचे पाणी काढण्यासाठी नाली तयार करण्यात आली. परंतु ती अर्धवट असल्याने प्झिंगाबाई टाकळी, बाबा फरीदनगर, मानकापूर परिसरातील नागरिकांच्या घरासह दुकानांमध्येसुद्धा पाणी शिरले.
विमानतळावरील पाणी वस्तीत
विमानतळाला लागून या वस्त्या वसलेल्या आहेत. विमानतळाचा परिसर उंचावर असून या वस्त्या खालच्या भागात येतात. त्यामुळे विमानतळावरील पाणी थेट या वस्त्यांमध्ये येऊन जमा होते, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

Web Title: When will the solution go out?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.