रामटेक, माैदा बाजार समित्यांची निवडणूक घेणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:07 IST2021-06-27T04:07:10+5:302021-06-27T04:07:10+5:30
राहुल पेटकर लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : रामटेक व माैदा या दाेन तालुकामिळून असलेल्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे ...

रामटेक, माैदा बाजार समित्यांची निवडणूक घेणार कधी?
राहुल पेटकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : रामटेक व माैदा या दाेन तालुकामिळून असलेल्या रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे साडेसहा वर्षापूर्वी विभाजन करून रामटेक व माैदा या दाेन कृषी उत्पन्न बाजार समित्या तयार करण्यात आल्या. या दाेन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची करण्यात आलेली नियुक्ती आजही कायम आहे. वास्तवात, या बाजार समित्यांच्या निवडणुका वेळीच हाेणे अपेक्षित असताना त्या घेण्यात न आल्याने त्याचा बाजार समित्यांच्या सर्वांगीण विकासावर परिणाम झाला आहे.
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीची शेवटची निवडणूक जून २०१० मध्ये घेण्यात आली हाेती. त्यावेळी लक्ष्मण उमाळे यांची सभापती तर नकुल बरबटे यांची उपसभापतिपदी निवड करण्यात आली हाेती. या संचालक मंडळाने डिसेंबर २०१४ पर्यंत बाजार समितीचा कारभार सांभाळला. डिसेंबर २०१४ मध्ये या बाजार समितीचे रामटेक व माैदा या दाेन बाजार समित्यांमध्ये विभाजन करण्यात आले. त्याचवेळी या दाेन्ही बाजार समित्यांवर प्रशासकांची व नंतर अशासकीय संचालक मंडळाची नियुक्ती करण्यात आली.
या विभाजनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आल्याने राज्य शासनाने केलेले बाजार समितीचे विभाजन उच्च न्यायालयाने या विभाजनाला सन २०१५ मध्ये स्थगनादेश दिला. प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने राज्य शासनाला या बाजार समित्यांच्या निवडणुका घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे या दाेन्ही बाजार समित्यांचा कारभार पाहण्यासाठी त्यावर प्रशासकांची नियुक्ती करणे क्रमप्राप्त हाेते. या काळात राज्य शासनाने त्रुटींची पूर्तता केल्याची माहिती न्यायालयाला सादर केली. त्यामुळे न्यायालयाने सन २०१७ मध्ये या विभाजनाला मान्यता दिली. सध्या रामटेक बाजार समितीचा कारभार प्रशासक म्हणून रामटेकचे सहायक निबंधक तर माैदा बाजार समितीचा कारभार माैद्याचे सहायक निबंधक कारभार बघत आहेत.
....
एक तालुका, एक बाजार समिती
रामटेक कृषी उत्पन्न बाजार समितीचे डिसेंबर २०१४ मध्ये विभाजन करून रामटेक व माैदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली. या विभाजनामागे राज्य शासनाचा ‘एक तालुका, एक बाजार समिती’ ही संकल्पना हाेती. त्यामुळे या दाेन्ही स्वतंत्र बाजार समित्या तयार करण्यात आल्या. विभाजनापासून आजवर या दाेन्ही बाजार समित्यांवर अशासकीय प्रशासक मंडळांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक व प्रशासक मंडळाला महत्त्वाचे निर्णय घेण्याबाबत काही मर्यादा आहेत.
....
विकास कामांना खेळ
शेतकऱ्यांच्या दृष्टीने बाजार समित्यांना विशेष महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाची चांगल्या पद्धतीने विक्री व्हावी, यासाठी बाजार समित्यांच्या आवारात काही महत्त्वाची विकास कामे करणेही गरजेचे आहे. बाजार समित्यांवर संचालक मंडळ असल्यास विकास कामांच्या बाबतीत ठाेस निर्णय घेणे सुकर हाेते. या दाेन्ही बाजार समित्यांच्या अद्याप निवडणुका घेण्यात न असल्याने साडेसहा वर्षात येथील विकास कामांना खीळ बसली असून, त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसत आहे.
...
कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले
या दाेन्ही बाजार समित्यांनी निवडणुकीला लागणाऱ्या खर्चाचा भरणा राज्य शासनाकडे केला आहे. या दाेन्ही बाजार समित्यांवर संचालक मंडळ नसल्याने या काळात बाजार समित्यांना त्यांचे उत्पन्नाचे स्राेत वाढविणे शक्य झाले नाही. उत्पन्न न वाढल्याने विकास कामेही थांबली. एवढेच नव्हे तर माैदा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांना मागील सात महिन्यांपासून त्यांचे मासिक वेतनही देण्यात आले नाही.