हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र कधी सुरू होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:25+5:302021-02-05T04:42:25+5:30
हिवरा बाजार : रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी स्थानिक शेतकरी गत तीन ...

हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र कधी सुरू होणार?
हिवरा बाजार : रामटेक तालुक्यातील हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र तातडीने सुरू करण्याची मागणी स्थानिक शेतकरी गत तीन महिन्यापासून सातत्याने करीत आहेत. मात्र प्रशासनाकडून यासंदर्भात कोणत्याही उपाययोजना आखण्यात आलेल्या नाही. यासंदर्भात बुधवारी प्रहारचे जिल्हाध्यक्ष रमेश कारमोरे आणि त्यांचे सहकारी मनीष जवंजाळ यांनी हिवरा बाजार येथे मुख्य बाजार चौकात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. जोपर्यंत शासनाकडून धान खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार नाही तोवर आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. गेल्या अनेक दिवसापासून हिवरा बाजार येथे धान खरेदी केंद्र प्रस्तावित आहे. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे धान खरेदी केंद्र दोन महिन्याच्या अगोदर सुरू होणार होते. ती अधिकाऱ्यांच्या व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे सुरू झालेले नाही. त्याकरिता आज हिवरा बाजार येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आंदोलनाची दखल घेत देवलापारचे अप्पर तहसीलदार प्रेम आडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकरी आणि आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा करून येत्या शुक्रवारपर्यंत हिवरा बाजार येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू होणार असल्याबाबतची ग्वाही दिली. यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी हिवरा बाजार व परिसरातील शेतकरी फुलचंद बमनोटे, शामराव मडावी, रमेश बमनोटे, तेजलाल बमनोटे, गंगाराम बाविसताले, पंचम कोवाचे, झनक बर्वे, मनोज जयस्वाल, जयराम मेहर, मूलचंद शिवणे, अरुण बावणे, नरेंद्र गायधने, प्रल्हाद मडावी, विनोद बमनोटे, ईश्वर उईके, बिपीन बमनोटे, भगत इनवाते, झाडूलाल सलामे असे अनेक शेतकरी उपस्थित होते.