नागपूर पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?
By Admin | Updated: August 11, 2015 03:31 IST2015-08-11T03:31:23+5:302015-08-11T03:31:23+5:30
देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नागपूरसुद्धा

नागपूर पॉलिबॅगमुक्त कधी होणार ?
नागपूर : देशातील बहुतांश राज्यांमध्ये पॉलिथिन बॅगवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच धर्तीवर नागपूरसुद्धा पॉलिबॅग मुक्त व्हावे, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. महाराष्ट्र सरकारने २००६ मध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगची निर्मिती, विक्री आणि उपयोगावर प्रतिबंध लावण्याचा नियम लागू केला. त्याची अंमलबजावणीही झाली. त्यानंतरही छोटे दुकानदार, हातठेल्यावर सामान विकणारे विक्रेते या नियमाचे सर्रास उल्लंघन करीत आहेत. ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिथिन बॅगमध्ये ग्राहकांना वस्तू देत असल्याचे बाजारात चित्र आहे. यामुळे मनपाच्या आरोग्य विभागाच्या कार्यप्रणालीच्या चिंधड्या उडाल्या आहेत. या विभागाचे अधिकारी दुकानदारांवर कारवाई तर करतात, पण दुसऱ्याच मिनिटाला विक्रेते या नियमाची ऐसीतैसी करतात.
राज्यात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅग निर्मितीवर प्रतिबंध असतानाही बाजारात एवढ्या मोठ्या प्रमाणात बॅग कुठून येतात, हा गंभीर प्रश्न आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळसुद्धा पॉलिबॅग तयार करणाऱ्या उद्योगांवर नियंत्रण आणू शकत नाही, असेही म्हणणे चुकीचे ठरेल. जनजागृती हाच त्यावर उपाय आहे.
नागनाल्याचा प्रवाह प्रभावित
४५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगचे पुनर्चक्रण होऊ शकत नाही. या बॅग नदी, तलाव, नाल्यांमध्ये फेकल्यामुळे पाणी प्रदूषित होते. नाल्याचा प्रवाह प्रभावित होतो. नागनाला (पूर्वमध्ये नदी) हे त्याचे ताजे उदाहरण आहे. अशा स्थितीत नागरिकांनी कमी जाडीच्या बॅगचा उपयोग करू नये. त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कापडी थैल्यांचा अधिकाधिक उपयोग करावा. या विषयावर जनजागृती अत्यंत महत्त्वाची आहे.
पॉलिथिन खाल्ल्याने
जनावरांचा मृत्यू
४प्रदूषण नियंत्रणावर काम करणाऱ्या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या मुद्यावर संस्थेचे अभियान सुरू आहे. कमी जाडीचे पॉलिबॅग खाल्ल्यानंतर जनावरांमध्ये विशेषत: गायी मृत्युमुखी पडतात. पॉलिथिनमुळे नाल्या तुंबल्यानंतर मुंबईत पूर आला होता. नागपुरातील मॉल्स आणि मोठी दुकाने वगळता सुमारे ६० टक्के छोटे दुकानदार आणि हातठेल्यांवर आतासुद्धा ५० मायक्रॉनपेक्षा कमी वजनाच्या प्लॅस्टिक बॅगचा धडाक्यात उपयोग सुरू आहे. अशा विक्रेत्यांवर प्रतिबंध लावण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया ग्राहक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
नियमानुसार उत्पादन
४विदर्भ प्लॅस्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या माजी पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात नियम लागू झाल्यानंतर ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक बॅग तयार करणे बंद केले. आधी जे या व्यवसायात होते, त्यांनीसुद्धा आपला व्यवसाय बंद केला आहे. आता ते प्लॅस्टिकची उत्पादने तयार करतात. शहरात विकल्या जाणाऱ्या पॉलिबॅग लगतच्या राज्यातून येतात. त्याचे प्रमाण ५ ते १० टक्के आहे.
मनपाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
४मनपाच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शहरात ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पॉलिबॅगची विक्री करणाऱ्यांवर निरंतर कारवाई करण्यात येते. पण सध्या कारवाई मंदावल्याचे त्यांनी मान्य केले. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी रेकॉर्ड पाहून आकडेवारी देऊ, असे सांगितले.
लेह लडाखपासून धडा घ्यावा
४लेह लडाख दीड दशकाआधीच पॉलिथीन बॅगमुक्त झाला आहे. तेथील लोक नमूद केलेल्या जागेवरच बॅग फेकतात. त्या बॅगचा साठा लेह लडाखच्या बाहेर नेला जातो. त्यांच्यापासून धडा घेण्याची गरज आहे.
प्रदूषणमुक्त होण्यात सहभागी व्हा
४पॉलिथीन बॅगचा तुम्ही उपयोग करीत असल्यास प्रदूषण वाढविण्यात तुमचाही तेवढाच सहभाग आहे. नियमानुसार ५० मायक्रॉनपेक्षा जाड पॉलिबॅगचा उपयोग करा. खरेदीसाठी कापडाची थैली सोबत न्यावी. प्रदूषणमुक्त शहर बनविण्यात तुम्हीसुद्धा सहभागी होऊ शकता.