सरकार प्राध्यापक भरतीसाठी कधी पुढाकार घेणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:06 IST2021-07-24T04:06:43+5:302021-07-24T04:06:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक ...

सरकार प्राध्यापक भरतीसाठी कधी पुढाकार घेणार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात रखडलेली प्राध्यापक भरतीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेतर्फे पाच दिवसापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. सरकार प्राध्यापक भरतीसाठी कधी पुढाकार घेणार असा सवाल नवप्राध्यापकांनी उपस्थित केला आहे.
राज्यात १८ हजाराहून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. लवकरात लवकर भरती सुरू करण्यात येईल. तसेच वित्त विभागाने ४० टक्के प्राध्यापक भरतीसाठी मान्यता दिल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले होते. मात्र त्याची पूर्तता झालीच नाही. शासनाच्या वेळकाढू धोरणाविरोधात महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने राज्यव्यापी साखळी उपोषण सुरू केले आहे. नागपुरात उच्च शिक्षण सहसंचालकांच्या कार्यालयासमोर उपोषण सुरू आहे. जोपर्यंत भरतीचा निर्णय जाहीर होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात १०० टक्के पदभरती करावी, तासिका तत्वावरील प्राध्यापकांना केंद्रीय विद्यापीठाच्या धर्तीवर मानधन द्यावे, तासिका प्राध्यापकांच्या कामाचा अनुभव नियुक्तीनंतर ग्राह्य धरण्यात यावा या मागण्या संघटनेने ठेवल्या आहेत.
एकाही नेत्याकडून दखल नाही
निवडणुका आल्यावर सर्वपक्षीय नेते प्राध्यापक संघटनांकडे मतं मागायला येतात. मात्र राज्यातील भरती रखडली असताना सत्ताधारी व विरोधक मूग गिळून गप्प आहेत. शिक्षण क्षेत्राबाबत नेते खरोखरच गंभीर आहेत का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.