लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे अगोदरच यंदाचे शैक्षणिक सत्र लांबले आहे. त्यातच अभियांत्रिकीच्या प्रवेशपरीक्षा व त्यांचे निकालदेखील उशिरा लागले. आता निकालदेखील जाहीर झाले असले तरी अद्यापही तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे प्रवेशप्रक्रिया सुरू तरी कधी होणार, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
जेईई तसेच एमएचटीसीईटीचा निकाल घोषित झाला आहे. दुसरीकडे यंदा विभागात बारावीचा निकाल ९१.५० टक्के लागला व मागील वर्षीपेक्षा ८ टक्क्यांहून अधिक वाढ दिसून आली. शिवाय कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांनी विभागातील महाविद्यालयांतील प्रवेश घेण्याचा मानस केला आहे. मात्र अद्यापही वेळापत्रकाची घोषणा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे डोळे शासनाकडे लागले आहेत.
जानेवारीत वर्ग सुरू करण्याचे आव्हान
कोरोनामुळे प्रवेशप्रक्रिया लांबणार असल्याचे गृहीत धरून एआयसीटीई तसेच नागपूर विद्यापीठानेदेखील नवीन शैक्षणिक कॅलेंडर जारी केले होते. एआयसीटीईच्या कॅलेंडरनुसार १ डिसेंबरपासून वर्ग सुरू होणे अपेक्षित होते. तर राज्य सीईटी सेलच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीत प्रथम वर्षाचे वर्ग सुरू होतील असा दावा केला होता. मात्र आतापर्यंत सीईटी सेलने वेळापत्रकच घोषित केलेले नाही. वेळापत्रक घोषित झाल्यानंतर ऑनलाईन अर्ज भरणे, कागदपत्रांची पडताळणी, महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम व प्रवेशफेऱ्या यांना एक ते दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. अशा स्थितीत १ जानेवारीपासून वर्ग सुरू होणे कठीण दिसून येत आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक डॉ. राम निबुदे यांच्याशी प्रतिक्रियेसाठी संपर्क होऊ शकला नाही.
विभागात १८ हजार जागा
नागपूर विभागात सद्यस्थितीत ४७ अभियांत्रिकी महाविद्यालये असून तेथे १८ हजार २४० विद्यार्थी आहेत. यातील व्यवस्थापन कोट्यातील जागा भरण्याकडे महाविद्यालयांचा कल आहे. मात्र सीईटीच्या जागा भरण्याचे मोठे आव्हान महाविद्यालयांसमोर असेल.