मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

By Admin | Updated: June 6, 2017 02:09 IST2017-06-06T02:09:00+5:302017-06-06T02:09:00+5:30

समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे.

When will the child's birth rate rise? | मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

मुलींचा जन्मदर वाढणार कधी?

उपराजधानीत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म : ६ वर्षांत आकडेवारी स्थिरच
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजात प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असून सगळीकडेच त्यांनी कर्तृत्व सिद्ध केले आहे. ‘बेटी बचावो’ मोहीम व्यापक पातळीवर राबविण्यात येत आहे. दहावी, बारावीसह स्पर्धा परीक्षांतदेखील नागपुरातील मुलीच ‘टॉप’ असतात. मात्र तरीदेखील राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मुलींचा जन्मदर हवा तसा वाढलेला नाही. गेल्या ६ वर्षांत जन्मदराची टक्केवारी जवळपास स्थिरच असून २०१७ मध्ये मुलांच्या तुलनेत सरासरी ९३ टक्के इतकीच आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारात नागपूर महानगरपालिकेकडे जन्म, मृत्यूसंदर्भात विचारणा केली होती. १ जानेवारी २०१२ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत नागपुरात किती मुलामुलींचा जन्म झाला, या कालावधीत नागपुरात किती मृत्यू झाले तसेच उपजत मृत्यूचे प्रमाण किती होते, इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते.
प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१२ ते मार्च २०१७ या कालावधीत २ लाख ९६ हजार ५६७ जन्म झाले. यात मुलांच्या जन्माची संख्या १ लाख ५३ हजार १०९ इतकी होती तर मुलींचा आकडा १ लाख ४३ हजार ४५८ एवढा होता. सरासरी मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण हे ९३.६९ टक्के एवढे होते. दरवर्षीची टक्केवारी लक्षात घेतली तर २०१५ मध्ये मुलांच्या तुलनेत ९४.८३ टक्के मुलींचा जन्म झाला. इतर सर्व वर्ष टक्केवारी ही ९३ व ९४ टक्क्यांच्या मध्येच होती. २०१७ मध्ये मार्च महिन्यापर्यंत मुलांच्या तुलनेत ९३ टक्के मुलींचा जन्म झाला.

सव्वा वर्षात ३४८ उपजत मृत्यू
दरम्यान, १ जानेवारी २०१६ ते ३१ मार्च २०१७ या कालावधीत शहरात एकूण ३४८ उपजत मृत्यूची प्रकरणे आढळून आली. यात २०२ मुले व १४६ मुलींचा समावेश होता.
सव्वा लाखांहून अधिक मृत्यूची नोंद
२०१२ पासून सव्वा पाच वर्षांच्या कालावधीत नागपूर मनपाच्या आरोग्य विभागातर्फे १ लाख ३३ हजार ७३८ मृत्यूची नोंद करण्यात आली. यात ८० हजार ५८२ पुरुष व ५३ हजार १५६ महिलांचा समावेश होता. २०१६ मध्ये सर्वाधिक २६ हजार ९२६ मृत्यूची नोंद करण्यात आली.

Web Title: When will the child's birth rate rise?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.