बोखारा पाणीपुरवठा योजना कधी कार्यान्वित होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST2021-02-05T04:42:47+5:302021-02-05T04:42:47+5:30
कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पूर्णत्वास आलेली बोखारा येथील पाणीपुरवठा योजना तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली ...

बोखारा पाणीपुरवठा योजना कधी कार्यान्वित होणार?
कोराडी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पूर्णत्वास आलेली बोखारा येथील पाणीपुरवठा योजना तत्काळ कार्यान्वित करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केलेली आहे. तीन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री पेजल -२ अंतर्गत ही योजना मंजूर करण्यात आली होती. २०१८ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली ही योजना पूर्णत्वास आलेली आहे. मार्च २०२० पासून प्रारंभिक चाचणी नंतर ही योजना पूर्णपणे बंद आहे. चाचणी काळात या योजनेला आलेले पंधरा लाखांचे महानगरपालिकेचे पाण्याचे बिल न भरल्याने या योजनेचा पाणीपुरवठा महानगरपालिकेने बंद केलेला आहे. हे पैसे कोणी भरायचे यावरही बरेच चर्चा बैठका झाल्या. ग्रामपंचायतीनुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने ही योजना कार्यान्वित करण्यापूर्वी चाचणीसाठी पाणी वापरल्याने या बिलाची राशी मजीप्राने भरावे, परंतु चाचणीनंतर काही प्रमाणात पाणी नागरिकांना देण्यात आल्याचे कारण समोर करून ग्रामपंचायतने ही राशी भरावी, अशा प्रकारचा आग्रह मजीप्राचा आहे. अखेर तोडगा निघून यातील पाच लाखांचे राशी संबंधित योजनेच्या कंत्राटदाराने भरण्याची तयारी दर्शविली. ती राशी भरलीसुद्धा आहे उर्वरित राशी ग्रामपंचायतला भरावयाची आहे. या योजनेचे ७० टक्के मीटर लावण्याचे काम पूर्ण झाले असून अद्याप काही मीटर लावायचे आहेत. ही योजना तत्काळ सुरू करावी व नागरिकांना पाणी द्यावे या मागणीसाठी आ. समीर मेघे यांना निवेदन देण्यात आले. या बैठकीला भाजपचे बोखारा अध्यक्ष बाबा नागपूरकर, विलास भालेराव, पुरुषोत्तम महाडिक, गजानन फुंडकर, जितेंद्र पिंपळे, मंगेश सावरकर, सुखदेव भोंडे उपस्थित होते. बोखारा ग्रामपंचायतीने प्रत्येक नळधारकांना साडेतीन हजार रुपये भरण्याचा आग्रह केला आहे. यातील दोन हजार रुपये मीटरचे तर पंधराशे रुपये डिपॉझिट म्हणून सांगण्यात आले आहे. यावरून सदस्यांमध्ये अनेक मतभेद आहेत काही ग्रामपंचायत सदस्यांच्या मते एवढ्या रकमेची गरज नाही तर सरपंचांच्या मतानुसार साडेतीन हजार घेतल्याशिवाय ही योजना यशस्वीपणे चालविणे शक्य होणार नाही. ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला एक वर्षेपर्यंत चालून दाखवायचे आहे.
त्यानंतर या योजनेचे ग्रामपंचायतला हस्तांतरण करण्यात येईल. सद्य:स्थितीत ही योजना कार्यान्वित झाली नाही. मजीप्राने ग्रामपंचायतला हस्तांतरित केली नाही, अशा स्थितीत ग्रामपंचायतीने आतापर्यंतची राशी का भरावी, असाही एक मतप्रवाह आहे. अशा अनेक समस्यांमध्ये चालू होण्यापूर्वी ही पाणीपुरवठा योजना अडकल्याने या पाणीपुरवठा योजनेचे भविष्य अंधकारमय दिसत आहे.
फेब्रुवारी महिन्यात देणार पाणी
यासंदर्भात बोखारा ग्रामपंचायतीचे सरपंच अनिता बाबा पंडित यांच्याशी संपर्क साधला असता थकीत राशी भरण्यावर पर्याय शोधून ही योजना शक्य तितक्या लवकर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे. या योजनेतील मजीप्राकडून लावण्यात येणारे पाणी मीटरचे काम अजून पूर्ण झालेले नाही. हे काम अतिशीघ्र पूर्ण करण्याचे त्यांना सुचविण्यात आले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत या योजनेअंतर्गत सर्वांना पाणी मिळेल, अशी अपेक्षा सरपंच पंडित यांनी व्यक्त केली.