When will Apali bus start? | कधी निघणार आपली बसचा मुहूर्त : नागपुरातील नागरिकांना मनस्ताप

कधी निघणार आपली बसचा मुहूर्त : नागपुरातील नागरिकांना मनस्ताप

ठळक मुद्देप्रशासन-पदाधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एसटी महामंडळ, खासगी ट्रॅव्हल्सनंतर आता मेट्रो रेल्वेदेखील सुरू झाली आहे. मात्र शहर बससेवा आपली बस सुरू होण्यासाठी अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. नागरिक आपली बसची आतूरतेने प्रतीक्षा करत असताना मनपा प्रशासन आणि सत्तापक्षाच्या हलगर्जीपणामुळे शहर बस संचालन अद्यापही रखडलेलेच आहे. परिवहन समितीने ५० टक्के क्षमतेसोबतच शहर बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दोन आठवड्याअगोदरच संमत केला आहे. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे बससेवा कधी सुरू होणार यावर बोलण्यासाठी कुणीही तयार नाही.

कोरोना संक्रमणामुळे २३ मार्चपासून शहरात बससेवा बंद करण्यात आली. मिशन बिगिन अगेनअंतर्गत राज्यातील अनेक शहरांमध्ये शहर बससेवा सुरू झाली. मात्र नागपुरात अद्यापपर्यंत निर्णय झालेला नाही. जर सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली तर संक्रमण वाढू शकते असा प्रशासनाचा अंदाज आहे. मात्र एसटीने पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू केली आहे. त्यामुळे संसर्ग वाढलेला दिसून आलेला नाही. सद्यस्थितीत शाळा-महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद आहेत. त्यामुळे आपोआपच अर्धे प्रवासी कमी होतील. मात्र तरीदेखील प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या शंकेमुळे मनपा प्रशासनाने अद्याप पावले उचलली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय सत्तापक्षाने ठोस भूमिका घेतलेली नसल्याने निर्णय होऊ शकलेला नाही.

नागरिकांना होतेय अडचण

ऑटो, कॅबमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे शक्य नाही. मात्र बससेवा नसल्याने त्यांना नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे. बसमध्ये ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळणे शक्य होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.

Web Title: When will Apali bus start?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.