विद्यार्थी परिषद निवडणुका कधी?
By Admin | Updated: September 1, 2014 01:07 IST2014-09-01T01:07:47+5:302014-09-01T01:07:47+5:30
सप्टेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर ‘नॅक’ समितीचा दौरा तसेच शंभराव्या दीक्षांत समारंभाचे आव्हान आहे. विद्यापीठातर्फे यासाठी जोरदार तयारी सुरू असली

विद्यार्थी परिषद निवडणुका कधी?
नागपूर विद्यापीठ : निवडणूक अधिसूचनेची अद्यापही प्रतीक्षा
नागपूर : सप्टेंबर महिन्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासमोर ‘नॅक’ समितीचा दौरा तसेच शंभराव्या दीक्षांत समारंभाचे आव्हान आहे. विद्यापीठातर्फे यासाठी जोरदार तयारी सुरू असली तरी या गडबडीत दरवर्षी होणाऱ्या विद्यार्थी परिषद निवडणुकांसंदर्भात नागपूर विद्यापीठात अद्यापपर्यंत कुठलीही हालचाल दिसून आलेली नाही. निवडणुकांची तारीख अद्याप घोषित झाली नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मागील वर्षीदेखील प्रवेशबंदीच्या मुद्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका विलंबाने झाल्या होत्या. विद्यार्थी संघटनांनी यासंदर्भात मौन धारण केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
साधारणत: दरवर्षी आॅगस्ट किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतात. विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या महाविद्यालयांतील विद्यार्थी प्रतिनिधींच्या निवडणुकांचा कार्यक्रम पार पडल्यानंतर विद्यार्थी परिषदेची घोषणा करण्यात येते. सप्टेंबरच्या अखेरपर्यंत तर सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण होते व साधारणत: आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका होतात. यातून विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या अध्यक्ष व सचिवाची निवड करण्यात येते.
परंतु यंदा महाविद्यालये सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. परंतु अजूनपर्यंत अधिसूचना जारी झालेली नाही. विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभागातर्फे अद्यापपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रमच घोषित झालेला नाही. महाविद्यालय विद्यार्थी परिषदेच्या निवडणूका लांबल्या तर त्याचा परिणाम विद्यापीठ विद्यार्थी परिषदेच्या निवडीवर पडेल.(प्रतिनिधी)