सोनेगाव राजाचे पुनर्वसन कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:39+5:302021-06-09T04:10:39+5:30
कामठी : तालुक्यातील सोनेगाव राजा गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्याच्या वतीने कन्हान नदीपात्रात मुंडण करून ...

सोनेगाव राजाचे पुनर्वसन कधी?
कामठी : तालुक्यातील सोनेगाव राजा गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी स्थानिक नागरिक आणि प्रहार जनशक्तीच्या कार्यकर्त्याच्या वतीने कन्हान नदीपात्रात मुंडण करून ठिय्या आंदोलन केले. सोनेगाव राजा हे गाव कन्हान नदीच्या तीरावर वसलेले आहे. या गावात नेहमीच कन्हान नदीच्या पुराचा फटका बसतो. आजवर आलेल्या विविध पुरात अनेकांची घरे पडली आहेत. पुराच्या पाण्यापासून होत असलेल्या त्रासाला कंटाळून १९८१ मध्ये गावकऱ्यांनी सरकारकडे इतरत्र पुनर्वसनाची मागणी केली होती. शासनाने २०१० मध्ये गावाशेजारी चार एकर जमिनीवर पुनर्वसनाच्या कामाला सुरुवात केली. पुनर्वसनाचे काम योग्यरीत्या न केल्यामुळे गावातील अनेक नागरिक पुनर्वसनाच्या ठिकाणी वास्तव्यास गेले नाही. त्यामुळे जुन्याच ठिकाणी नागरिक वास्तव्याला आहे. ऑगस्ट महिन्यात कन्हान नदीच्या महापुराने गावाला वेढले होते. यात गावकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पुनर्वसनाच्या ठिकाणी रोड, नाल्या, वीज, पाणी, शिक्षण व इतर महत्वाच्या सुविधा शासनाच्या वतीने त्वरित उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी अनेकदा निवेदन देण्यात आले. पण त्याकडे शासनाने दुर्लक्ष केले. सोनेगाव राजा गावाच्या पुनर्वसनाच्या मागणीसाठी प्रहार जनशक्तीचे छत्रपाल करडभाजने यांच्या नेतृत्वात कन्हान नदीपात्रात मुंडण करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी पंकज ढोरे, राजेश बोढारे, श्रीकांत ठाकरे, नकुल गमे, शुभम उघडे, कार्तिक भिसेकर, शुभम अटाळकर, रमेश पारधी, शुभम धावडे, पंकज बोबडे आदी उपस्थित होते.