वणवण न करता नोकरीच्या एक नव्हे अनेक संधी मिळतात तेव्हा
By Admin | Updated: February 1, 2015 00:55 IST2015-02-01T00:55:12+5:302015-02-01T00:55:12+5:30
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकालाच नोकरीची प्रतीक्षा असते. वेगवेगळ्या कंपनीत त्यासाठी मुलाखती देत फिरावे लागते. अनेकदा मुलाखती दिल्यावरही नोकरी मिळेल याची शाश्वती नसते

वणवण न करता नोकरीच्या एक नव्हे अनेक संधी मिळतात तेव्हा
हर्ड फाऊंडेशनचा उपक्रम : एकाच छताखाली पदवीधारकांना अनेक संधी उपलब्ध
नागपूर : शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रत्येकालाच नोकरीची प्रतीक्षा असते. वेगवेगळ्या कंपनीत त्यासाठी मुलाखती देत फिरावे लागते. अनेकदा मुलाखती दिल्यावरही नोकरी मिळेल याची शाश्वती नसते तर बरेचदा मुलाखतीचे उत्तरही येत नाही. या साऱ्याच प्रक्रियेत अनिश्चितता असते आणि नोकरीच्या वेगवेगळ्या संधी शोधण्यात उमेदवारांचा बराच वेळ वाया जातो. प्रामुख्याने इतर शहरातील नोकरीच्या संधी शोधताना बरेचदा तारांबळ उडते. पण एकाच ठिकाणी अनेक कंपन्यांच्या आणि वेगवेगळ्या शहरातील संधी उपलब्ध झाल्यात आणि मुलाखतीनंतर लगेच नोकरी पक्की झाल्याचे सांगण्यात आले तर उमेदवारांच्या आनंदाला पारावार नसतो. नेमका हाच अनुभव हर्ड फाऊंडेशनच्या रोजगार मेळाव्यात शनिवारी आला.
हर्ड फाऊंडेशनच्यावतीने पावनभूमी, वर्धा मार्ग येथे हा रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात हजारो पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी धारकांनी गर्दी केली. यात अनेक नवोदित आणि काही काळ नोकरीचा अनुभव असलेले युवक-युवती होते. यासाठी हर्ड फाऊंडेशनतर्फे भव्य शामियाना उभारण्यात आला होता. विशेषत: प्रत्येक उमेदवाराला त्याच्या क्षमता आणि शिक्षणाप्रमाणे तसेच आवडीच्या क्षेत्रात जाण्याच्या संधी येथे उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. दुपारी १२ वाजता या रोजगार मेळाव्याला प्रारंभ करण्यात आला. प्रथम सर्वच उमेदवारांना एक फॉर्म देण्यात आला. यात विविध कंपन्यांची नावे आणि त्यांना हवे असणारे उमेदवार, त्यांची एकूण संख्या आणि त्यांना देण्यात येणारे संभाव्य वेतन याची माहिती देण्यात आली. त्या विशिष्ट पदांसाठी शिक्षणाची काय अट आहे, याचीही माहिती यात देण्यात आली होती. त्याप्रमाणे उमेदवारांनी त्यांना हव्या असलेल्या क्षेत्राची निवड करुन संबंधित कंपनी, बँक आदी संस्थात मुलाखती देऊन स्वत:ची नोकरी पक्की केली. मुलाखत झाल्यानंतर तत्काळ जॉब लेटर विविध कंपन्यांकडून उमेदवारांना देण्यात येत होते त्यामुळे नोकरीबाबत अनिश्चितता नव्हतीच. नोकरी पक्की झाल्याचीच ती पावती असल्याने युवक-युवतींच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते. अनेकांना बंगळुरु, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, पुणे येथे नोकऱ्या मिळाल्याने त्याना अतिशय आनंद झाला. पुण्यात जाऊन नोकरी शोधण्यापेक्षा नागपुरातच ही संधी उपलब्ध झाल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण होते. काही उमेदवारांना तर तब्ब्ल तीन ते चार कंपन्यांमध्ये नोकरीच्या आॅफर्स मिळाल्याने यातील कोणती नोकरी निवडावी, या विचारात ते पडले होते. (प्रतिनिधी)
एक नोकरी २० नागरिकांना गुन्हेगारीपासून वाचविते
युवकांना नोकरी मिळणे त्यांना हवे ते काम मिळणे हे निरोगी समाजासाठी अतिशय आवश्यक आहे. त्यामुळेच निरोगी समाज निर्माण करण्यासाठी हर्ड फाउंडेशनने हा उप्करम राबविला. एका पाहणीनुसार नोकरी वा काम मिळाले नाही तर लोक गुन्हेगारीकडे वळतात. एका व्यक्तीला नोकरी मिळाल्याने जवळपास २० लोक गुन्हेगारीपासून दूर राहतात, असा निष्कर्ष निघाला. युवकांना रोजगार मिळावा म्हणून हर्ड फाऊंडेशनने हा उपक्रम राबविला. समाजातल्या तळागाळातल्या आणि ग्रामीण विभागातील मुलांना चांगल्या संधी निर्माण करून देणे, त्यांना मार्गदर्शन करणे हा हर्ड फाऊंडेशनचा उद्देश असल्याचे मत फाऊंडेशनचे संचालक डॉ. अमोल देशमुख यांनी व्यक्त केले.
नोकरीसाठीची वणवण अनुभवल्याने ही संकल्पना सुचली
आपण स्वत: नोकरी केली आणि त्यासाठी खस्ताही खाल्या. इंग्लंडमध्ये नोकरी मिळविण्यासाठी मला ११७ ठिकाणी सीव्ही पाठवावा लागला त्यानंतर एका मुलाखतीची आॅफर आली. घरात राजकीय वातावरण असल्याने ग्रामीण भागातील अनेक युवक शिफारशी घेऊन नोकरी मागायला येतात, त्यावेळी वाईट वाटते. या युवकांसाठी संधी निर्माण करण्याच्या प्रयत्नातूनच हा उपक्रम उभा राहिला. दरवर्षी यातून हजारो युवकांना रोजगार मिळतो आहे. यंदा एकूण सहा हजार नोकऱ्या येथे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागातल्या युवकांचा विकास साधण्याचाही हा संकल्प आहे. मागील वर्षी इयत्ता १० ते पदव्युत्तर पदवीपर्यंतच्या उमेदवारांचा मेळावा एकत्र आयोजित केला. पण त्यात खूप गर्दी झाली. यंदा पदविका आणि पदवी यांचा स्वतंत्र मेळावा आयोजित केल्याचे डॉ. अमोल देशमुख यांनी सांगितले.
१५०० उमेदवारांची नोकरी पक्की
एकूण सहा हजार जागांसाठी या मेळाव्यात अनेक पात्र उमेदवारांनी हजेरी लावली. यातील काहींना नोकरीसाठी काही अधिक अर्हता अर्जित करण्याच्या सूचना देण्यात आल्यात तर १५०० पेक्षा जास्त उमेदवारांना थेट नोकरीची आॅफ रच देण्यात आली. त्यामुळे किमान १५०० उमेदवारांची नोकरी पक्की झाली आहे. यासाठी हर्ड फाऊंडेशनशी संबंधित सर्व संस्थांचे प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांनी योगदान दिले. उमेदवारांना नोकरी मिळाल्यावर त्यांना वाटणारे समाधान हेच आमचे यश आम्ही मानतो, असे मत व्हीएसपीएमचे चीफ आॅपरेटिंग आॅफिसर संजय जोग यांनी सांगितले. या मेळाव्यात मुलाखत कशी द्यावी, आपली देहबोली कशी असावी, सकारात्मकता आणि ताणाचे नियोजन याबाबातही मार्गदर्शन करण्यात आल्याचे जोग यांनी सांगितले.