विमानाचे अपहरण होते तेंव्हा...

By Admin | Updated: November 21, 2015 03:23 IST2015-11-21T03:23:45+5:302015-11-21T03:23:45+5:30

डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अचानक उदयपूरहून कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या इमरजन्सी लॅन्डिगचा संदेश मिळाला.

When the plane was hijacked ... | विमानाचे अपहरण होते तेंव्हा...

विमानाचे अपहरण होते तेंव्हा...

विमानतळावर ‘मॉकड्रील’च्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणेची चाचपणी
नागपूर : डॉ बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी अचानक उदयपूरहून कोलकाताला जाणाऱ्या विमानाच्या इमरजन्सी लॅन्डिगचा संदेश मिळाला. थोड्याच वेळात या विमानाचे अपहरण झाल्याची माहिती धडकल्याने विमानतळावर एकच खळबळ उडाली. दहशतवाद्यांनी अल्फा ब्रावो २४७ या विमानाचे अपहरण करून काही प्रवाशांना बंधक बनविले होते. माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. हे विमान विमानतळावर सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले, तशी क्यूआरटी, सीआयएसएफ व स्थानिक पोलीस जवानांची धावपळ सुरू झाली. विमानात पाच दहशतवादी एके-४७ रायफलसह असल्याचे समजले. त्यांनी विमानातील प्रवाशांना मारण्याची धमकी देत, येरवडा तुरुंगात असलेल्या दहशतवाद्याला सोडण्यासह १०० मिलियन अमेरिकन डॉलरची मागणी ठेवली होती. सुरक्षा यंत्रणांनी दहशतवाद्यांना मागण्या पूर्ण करण्याचा बहाणा करीत बोलण्यात गुंतविले आणि या वेळात हल्ल्याची तयारी केली. पायलटकडून इशाऱ्याच्या भाषेत दहशतवाद्यांच्या हालचाली आणि ओळख पटविण्यात आली. त्यानंतर या दहशतवाद्यांना बोलणी करण्यासाठी खाली बोलविण्यात आले. ते खाली उतरताच त्यांच्यावर दणादण गोळ्या झाडण्यात आल्या. दहशतवाद्यांनीही पलटवार केला, मात्र अखेर पाचही दहशतवाद्यांना कंठस्नान घालून विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षित वाचविण्यात आले.
तब्बल दोन ते अडीच तास रंगलेला हा अपहरनाट्याचा थरार विमानतळावरील प्रवाशांनी अनुभवला. हे अपहरण नाट्य खरेच आहे, असे वाटल्याने अनेकांची बोबडी वळली. मात्र हे मॉकड्रिल असल्याचे कळल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. मिहान इंडिया, एअरपोर्ट आॅथारिटी आॅफ इंडिया आणि स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत करवडे यांच्या नियंत्रणात विमान अपहरणाचे हे प्रात्यक्षिक साकारण्यात आले.
दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केल्यास, अशा परिस्थितीला कसे तोंड द्यायचे, याचे प्रशिक्षणच या मॉकड्रिलच्या माध्यमातून जवानांना देण्यात आल्याचे श्रीकांत करवाडे यांनी यावेळी सांगितले. विमानाचे प्रत्यक्षात अपहरण झाल्यास प्रसंगावधानच वापरावे लागते, मात्र अशा परिस्थितीची जाणीव या माध्यमातून होत असल्याचे ते म्हणाले. सुरक्षा यंत्रणेच्या सजगतेची चाचपणी करण्यासाठी दरवर्षी मॉकड्रिल केली जात असल्याचे करवडे यांनी सांगितले. सध्या विमानतळाच्या बाहेर पोलीस व आतमध्ये सीआयएसएफच्या जवानांकडे सुरक्षेची जबाबदारी आहे. आमचे जवान प्रत्येक परिस्थितीशी तोंड देण्यास सज्ज असल्याचा विश्वास करवडे यांनी व्यक्त केला. गरज पडल्यास हैदराबाद किंवा दिल्लीहून दीड तासात एनएसजीचे कामांडोंना पाचारण केले जाऊ शकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मिहानचे वरिष्ठ एअरपोर्ट संचालक अवधेश प्रसाद यांनी सुरक्षा आणि कोणतेही अत्याधुनिक वेपन तपासण्यासाठी सुसज्जित असल्याची माहिती दिली. सुरक्षा व्यवस्था आणखी कठोर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विमानतळावर असलेल्या अत्याधुनिक डॉपलर रडारच्या साहाय्याने आकाशात होणाऱ्या संदिग्ध हालचालीवरही लक्ष ठेवल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुख्य आॅपरेशन अधिकारी ग्रुप कॅप्टन अजय चौरसिया, मिहानचे मुख्य सुरक्षा अधिकारी यशवंत सराटकर, विमानतळाचे संचालक रोशन कांबळे, वरिष्ठ आॅपरेशन मॅनेजर आर. लक्ष्मीनारायणन, सीआयएसएफचे संचालक गुरजित सिंह आदी अधिकारी उपस्थित होते. ३० जवानांच्या मदतीने हे मॉकड्रील राबविण्यात आले.(प्रतिनिधी)

Web Title: When the plane was hijacked ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.