दीक्षाभूमीसाठी स्पेशल ट्रेनची घोषणा कधी?
By Admin | Updated: October 12, 2015 02:44 IST2015-10-12T02:44:39+5:302015-10-12T02:44:39+5:30
दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात.

दीक्षाभूमीसाठी स्पेशल ट्रेनची घोषणा कधी?
सोहळा नऊ दिवसावर : लवकर निर्णय घेण्याची गरज
नागपूर : दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी देशभरातून बौद्ध बांधव नागपुरात दीक्षाभूमीवर येतात. त्यांच्यासाठी रेल्वे प्रशासन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. परंतु हा सोहळा अवघा नऊ दिवसांवर आलेला असताना अद्यापही रेल्वे प्रशासनाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा न केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नागपुरात होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दरवर्षी देशभरातून हजारो भाविक येतात. त्यामुळे या काळात चारही दिशांनी येणाऱ्या रेल्वेगाड्यात प्रचंड गर्दीचे चित्र पाहावयास मिळते. यात मुंबईकडून असंख्य भाविक नागपुरात येतात.
मुंबई मार्ग आधीच वर्षभर व्यस्त राहतो. प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे प्रशासन पुढाकार घेऊन विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करीत असते. परंतु या वर्षी धम्मचक्र प्रवर्तनदिनाचा सोहळा नऊ दिवसांवर येऊन ठेपला असताना रेल्वे प्रशासनाने अद्याप विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केलेली नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष गाड्यांची घोषणा केल्यानंतर आणि त्याबाबतची प्रसिद्धी प्रसारमाध्यमात झाल्यानंतर त्याबाबतची माहिती प्रवाशांना कळते. त्यानंतर ते या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये आपले आरक्षण करतात. एकीकडे रेल्वे प्रशासन योग्य दराचे तिकीट काढून प्रवास करा, असा आग्रह धरते आणि दुसरीकडे ऐनवेळी विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा करते. रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी लवकर विशेष रेल्वेगाड्या जाहीर करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)