इन्टर्नशिप भ्रष्टाचाराची चौकशी कधी?
By Admin | Updated: December 6, 2014 02:42 IST2014-12-06T02:42:37+5:302014-12-06T02:42:37+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) चार वर्षांपासून इन्टर्नशिपच्या आडमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचे पितळ ...

इन्टर्नशिप भ्रष्टाचाराची चौकशी कधी?
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) चार वर्षांपासून इन्टर्नशिपच्या आडमध्ये सुरू असलेल्या कथित भ्रष्टाचाराचे पितळ वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून उघड झाले. यासंदर्भात पत्र पाठवून स्पष्टीकरण मागितले. परंतु मेडिकल प्रशासनाला अद्यापही याचे उत्तर मिळाले नसल्याने भ्रष्टाचार वरपर्यंत पोहोचल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रत्येकाला एक वर्षाची इन्टर्नशिप सक्तीची आहे. मेडिकलच्या विद्यार्थ्यांना १० विविध विभागात तर दोन महिने सावनेरमधील ग्रामीण रुग्णालयात काम करणे आवश्यक असते. मात्र काही विद्यार्थी १० महिन्यांमधून कोणी ९० तर कोणी ३० ते ४० दिवस गैरहजर राहतात. अशा आंतरवासितांकडून प्रति गैरहजर दिवस ५०० रुपये दंड याप्रमाणे सुमारे एक कोटी रुपये गोळा केल्याची माहिती आहे. याची तक्रार वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांपर्यंत पोहोचली. वैद्यकीय क्षेत्रात काळीमा फासणाऱ्या या प्रकरणाबाबत १६ सप्टेंबर रोजी मंत्रालयाकडून मेडिकल प्रशासनाला विचारणा झाली. प्रशासनाने हा विषय कॉलेज कौन्सिलमध्ये ठेवला. यात संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या पीएसएम विभागाकडून इन्टर्नवरील सर्व अधिकार काढून घेण्याचा निर्णय घेतला. आता हे अधिकार अधिष्ठात्यांकडे आले असून, त्यांच्या मार्गदर्शनात उपअधिष्ठात्यांच्या देखरेखीत कामकाज सुरू आहे. परंतु या मंत्रालयाच्या पत्राला तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी पीएसएम विभागाने त्यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे वरपर्यंत भ्रष्टाचार पसरल्याच्या चर्चेला मेडिकलमध्ये ऊत आला आहे. (प्रतिनिधी)