लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा/नरखेड : दाेन एकर शेतातील गव्हाच्या पिकाची कापणी केल्यानंतर शेतातच गंजी लावली हाेती. त्या गंजीने पेट घेतल्याने संपूर्ण गव्हाची राख झाली. यात १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती शेतकऱ्याने दिली. ही घटना भिष्णूर (ता. नरखेड) शिवारात गुरुवारी (दि. ११) मध्यरात्री घडली. आगीचे मूळ कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, ती लाग लावण्यात आली असावी, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.
वनिता शेषराव नासरे, रा. भिष्णूर, ता. नरखेड यांनी त्यांच्या दाेन एकर शेतात गव्हाची पेरणी केली हाेती. त्यांनी त्या पिकाची नुकतीच कापणी केली आणि मळणी करायला थाेडा उशीर असल्याने संपूर्ण गंजी शेतातच लावून ठेवली. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री त्या गंजीने पेट घेतला. ही आग लक्षात येईपर्यंत संपूर्ण गंजीची राख झाली. यात १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती वनिता नासरे यांनी दिली.
दुसरीकडे, ही आग लावली असल्याची शक्यताही वनिता नासरे यांच्यासह काही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे जलालखेडा पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविण्यात आली आहे. माहिती मिळताच पंचायत समिती सभापती नीलिमा रेवतकर, उपसभापती वैभव दळवी, सतीश रेवतकर, सहायक फाैजदार जाेशी, तलाठी नाखले यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.