गहू झाला आडवा, कापलेला हरभरा पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:20 IST2021-02-20T04:20:38+5:302021-02-20T04:20:38+5:30

उमरेड : खरीपात सोयाबीन आणि कपाशीने शेतकऱ्यांना धोका दिला. आता रबी हंगामात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना रडवीत आहे. रबी हंगामात ...

Wheat became horizontal, chopped gram in water | गहू झाला आडवा, कापलेला हरभरा पाण्यात

गहू झाला आडवा, कापलेला हरभरा पाण्यात

उमरेड : खरीपात सोयाबीन आणि कपाशीने शेतकऱ्यांना धोका दिला. आता रबी हंगामात अवकाळी पाऊस शेतकऱ्यांना रडवीत आहे. रबी हंगामात गहू, ज्वारी, हरभरा अनेकांच्या शेतात डोलत होता. येत्या काही दिवसात पीक हाती येईल आणि कोरोना काळात झालेली आर्थिक दैना थोडी फार दूर होईल. पैसाअडका हातात येईल, या आशेवर शेतकरी असतानाच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांचा उभा गहू आडवा झाला. ज्वारीचे पिकही झोपले. दुसरीकडे शेतात कापणी करून ठेवलेल्या हरभऱ्यावरही पावसाचे संकट कोसळले. हवामान खात्याच्या अंदाजानंतर दोन दिवसापासून आकाशात काळे ढग दाटून आले असताना गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला. काही ठिकाणी सुमारे अर्धा तास पावसाने झोडपल्याचाही प्रकार उमरेड तालुक्यात झाला. काही भागात गारांचा पाऊसही पडला. कळमना, सिंगोरी आणि बेला परिसरात सुमारे अर्धा तास पाऊस बरसला. उमरेड, मकरधोकडा, उदासा, ब्राह्मणी, आंबोली, सेव, गावसूत, आपतूर, बोथली, किन्हाळा, तीरखुरा, सावंगी, सिर्सी, मानोरी, कळमना, हिवरा-हिवरी, चनोडा, सुकळी, नांदरा, शेडेश्वर आदी गाव परिसरात विजांच्या कडकडाटासह तुरळक पाऊस पडला. काही मिनिटाच्या या पावसाने पिकांचे नुकसान केले. यामुळे पिकांच्या उत्पादन आणि चकाकीवर परिणाम होणार असल्याची कैफियत विलास दरणे, चंद्रशेखर ठवकर, नागसेन निकोसे, अश्विन उके, हन्नू शिंदे, पुरुषोत्तम बोबडे, कुणाल मुळे, रोशन सेलोटे, राजकुमार बेले, राजकुमार राऊत, श्रीकांत चिकनकर, प्रणय धोंगडे, राहुल तागडे, सचिन भाकरे, चेतन बकाल आदी शेतकऱ्यांनी मांडली. येत्या आठवड्यात गहू आणि ज्वारीचे पीक कापणीला येणार होते. हरभरा कापणीलाही चांगलाच वेग आला होता. अखेरच्या टप्प्यात हरभऱ्याची कापणी सुरू असतानाच निसर्गाने दणका दिला. तातडीने सर्वेक्षण करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे.

Web Title: Wheat became horizontal, chopped gram in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.