साहित्य व नाट्य अशा दोन वेगळ्या संमेलनांची गरज काय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 09:24 PM2019-01-23T21:24:10+5:302019-01-23T21:26:47+5:30

अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठी साहित्यात नाटकांना स्थान देण्यात येत नाही. त्यामुळेच मग साहित्य व नाट्य अशी दोन वेगवेगळी संमेलने घ्यावी लागतात. त्यामुळे खर्चदेखील दुप्पट होतो. एकत्र संमेलन घेतले असते तर वंचितांना उरलेल्या निधीतून मदत करता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

What is the need for two different conferences such as literature and drama? | साहित्य व नाट्य अशा दोन वेगळ्या संमेलनांची गरज काय ?

साहित्य व नाट्य अशा दोन वेगळ्या संमेलनांची गरज काय ?

Next
ठळक मुद्देनियोजित नाट्य संमेलनाध्यक्षांचा सवाल : मराठी साहित्यात नाटकांना स्थान नसल्याची खंत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी मराठी भाषेच्या साहित्यिकांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मराठीसाहित्यात नाटकांना स्थान देण्यात येत नाही. त्यामुळेच मग साहित्य व नाट्य अशी दोन वेगवेगळी संमेलने घ्यावी लागतात. त्यामुळे खर्चदेखील दुप्पट होतो. एकत्र संमेलन घेतले असते तर वंचितांना उरलेल्या निधीतून मदत करता आली असती, असे मत त्यांनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाच्या हीरक महोत्सवाच्या समापन प्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. विद्यापीठाच्या ग्रामगीता भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे हे होते तर विशेष अतिथी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी प्रमुख सतीश बडवे उपस्थित होते. मंचावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ.अक्षयकुमार काळे, प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी व डॉ.प्रमोद मुनघाटे हेदेखील उपस्थित होते. मराठी साहित्यात नाटकांना स्थान का देण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित करत त्यांनी मराठी भाषेला हे दिवस आपल्याच लोकांनी आणले असे ते म्हणाले. मराठी साहित्य व्यक्ती व्यक्तीचा संघर्ष रंगविण्यातच अडकले आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर सोडा पण देशस्तरावरदेखील मराठी साहित्य जात नाही. चर्चासत्रातच मराठी भाषेच्या विकासाच्या दिशा अडकून पडतात. आपण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळणार याची प्रतीक्षा करत आहोत. मात्र यासाठी दिल्लीच्या मान्यतेची आवश्यकता का, आपण अभिजात मराठी भाषा दिन सुरु करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रेमानंद गज्वी यांनी केले.
विद्यापीठ हे ज्ञानाची केंद्र आहे. येथील विभागात सद्यस्थितीत प्राध्यापकांवर कामाचा ताण आहे. विभागातील सर्व रिक्त पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजेत. राम गणेश गडकरी यांनी मराठी भाषेसाठी मौैलिक योगदान दिले. मात्र मराठी लोक त्यांनाच विसरले, असे मत सतीश बडवे यांनी व्यक्त केले. एखाद्या संस्थेचे वय वाढते तेव्हा ती संस्था बलशाली होते. मात्र मागील काही काळापासून शैक्षणिक संस्थांचे वय वाढत आहे व विविध अडचणींमुळे त्यांना वृद्धापकाळच येत आहे. ही स्थिती लवकरच बदलेल, असा विश्वास कुलगुरूंनी बोलून दाखविला.
एलकुंचवारांचा उल्लेख का नाही ?
यावेळी डॉ.अक्षयकुमार काळे यांनी प्रास्ताविकातून मराठी विभागाचा प्रवास मांडला. मात्र यात ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांच्या नावाचा विसर पडल्याची बाब प्रेमानंद गज्वी यांनी बोलून दाखविली. मराठी साहित्याचा विचार करत असताना त्यात नाटकांनादेखील स्थान मिळण्याची आवश्यकता आहे. मात्र साहित्यिक स्वत:च्याच सोयीचा विचार करतात, असा चिमटा त्यांनी काढला. विदर्भात रंगभूमी आहे, मात्र नाटके करण्यासाठी बाहेरील नट येतात. विदर्भात श्रीराम लागू यांच्यासारखे नट का निर्माण होत नाही, असा सवालदेखील त्यांनी केला.
महिलांना लुगडं नेसणे पुरुषांनी शिकविले
यावेळी गज्वी यांनी बालगंधर्वांबाबत बोलत असताना महिलांना लुगडं नेसणे पुरुषांनी शिकविले असल्याचे वक्तव्य केले. महिलांनी स्वत:चे संवर्धन करायला हवे होते. ते न झाल्याने पुरुषांना पुढाकार घ्यावा लागला. मराठी साहित्यात सौंदर्यदृष्टी आहे. मात्र त्यांची चर्चा होत नाही हे दुर्दैव आहे, असेदेखील ते म्हणाले. येत्या काळात रंगमंचावर नाटके होणार नाहीत. तर तंत्रज्ञानातील बदलामुळे घरी बसूनच नाटके पाहता येतील, असा अंदाजदेखील त्यांनी व्यक्त केला.
काळेंची विद्यापीठातील प्राध्यापकांच्या दर्जावर शंका
डॉ.अक्षयकुमार काळे यांनी नागपूर विद्यापीठातील प्राध्यापकांच्या दर्जावर शंका उपस्थित करणारे वक्तव्य केले. प्राध्यापक अक्षरश: पोस्टात पत्र टाकावे त्याप्रमाणे ‘रिसर्च पेपर’ प्रकाशित करण्यासाठी पाठवितात. प्राध्यापकांना ऐकण्यासाठी वर्गांत विद्यार्थी येत नाही. अगोदरच्या काळी दर्जेदार प्राध्यापक होते. आता तर विभागातून एकदा गेलेला प्रमुख परत येऊ नये यासाठी प्रयत्न होतो, असे ते म्हणाले.

 

Web Title: What is the need for two different conferences such as literature and drama?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.