चर्चेमागचे नेमके ‘लॉजिक’ काय?
By Admin | Updated: July 9, 2015 02:58 IST2015-07-09T02:58:22+5:302015-07-09T02:58:22+5:30
‘एमकेसीएल’सोबत बैठकीनंतर पेच आणखी वाढलानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पूर्ण कारभार पारदर्शक राहील,

चर्चेमागचे नेमके ‘लॉजिक’ काय?
नागपूर विद्यापीठ : ‘एमकेसीएल’सोबत बैठकीनंतर पेच आणखी वाढलानागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा पूर्ण कारभार पारदर्शक राहील, असा दावा कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात मात्र विद्यार्थी हितांच्या बाबीमध्येदेखील कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे. ‘एमकेसीएल’सोबत बुधवारी ‘दूध का दूध, पानी का पानी‘ होईल असा कुलगुरूंचा दावा गुरुवारी झालेल्या चर्चेनंतर पार हवेत विरुन गेला. या बैठकीत नेमके काय झाले याबाबत त्यांनी मौन साधले आहे. दुसरीकडे विद्यापीठाने सादर केलेल्या अटी ‘एमकेसीएल’ला मान्य नसल्याने हा सामंजस्य करार टिकण्यासंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. एका वेगळ््या कंपनीला सर्व कंत्राट देण्यासाठी हे सर्व करण्यात येत असल्याचे ‘लॉजिक’ सूत्रांनी मांडले आहे.
‘एमकेसीएल’ची सुमारे पावणेचार कोटी रुपयांची देयके थकीत आहेत. हा वाद निवळावा यासाठी ‘एमकेसीएल’चे अधिकारी बुधवारी चर्चेसाठी विद्यापीठात आले होते. चर्चेदरम्यान काही रक्कम सुरुवातीला देण्यास विद्यापीठाने तयारी दाखवली. परंतु त्यासाठी काही अटीदेखील मांडल्या. यात ‘एमकेसीएल’सोबत झालेल्या सामंजस्य करारात सुधारणा करणे, सोपविण्यात आलेल्या सेवांमध्ये घट करणे, ई-सुविधेचे कमी पैसे देणे अशा प्रकारच्या अटींचा समावेश होता. साहजिकच ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांना या अटी पटल्या नाहीत. विद्यापीठाला सेवा देऊनदेखील देयके देण्यासाठी जाचक असल्याची त्यांनी स्पष्टोक्ती केली. कुठल्याही निर्णयशिवाय बैठक संपली. संबंधित मुद्यावर आता मी काहीच बोलणार नाही. व्यवस्थापन परिषदेत हा मुद्दा ठेवण्यात येईल असे कुलगुरूंनी यानंतर स्पष्ट केले.परंतु सायंकाळी ६ नंतर परत एकदा ‘एमकेसीएल’च्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. यावेळी प्रशासनातील इतर अधिकारीदेखील उपस्थित होते. सुमारे अर्धा तास ही बैठक चालली. यानंतर ‘एमकेसीएल’चे पदाधिकारी ज्यावेळी बाहेर निघाले तेव्हा कुठलीही प्रतिक्रिया देण्यासाठी ते तयार नव्हते. एका अधिकाऱ्याची तर चक्क तब्येतच खराब झाली. विद्यापीठानेदेखील यासंदर्भात मौन साधले आहे. कोट्यवधींच्या देयकांच्या या मुद्द्यावर नेमकी एकाच दिवसात दुसऱ्यांदा चर्चा घेण्याची वेळ का आली असा प्रश्न उपस्थित होत आहे.(प्रतिनिधी)