हे कसले लसीकरण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:09 IST2021-03-17T04:09:11+5:302021-03-17T04:09:11+5:30
उमरेड : रुग्णालयात प्रवेश करताच नोंदणीसाठी लावलेले टेबल-खुर्ची. बाजूलाच लाकडी बाकावर असलेली आसनव्यवस्था अगदी लागूनच लसीकरणाची खोली आणि यालगतच ...

हे कसले लसीकरण?
उमरेड : रुग्णालयात प्रवेश करताच नोंदणीसाठी लावलेले टेबल-खुर्ची. बाजूलाच लाकडी बाकावर असलेली आसनव्यवस्था अगदी लागूनच लसीकरणाची खोली आणि यालगतच वृद्धांच्या देखरेखीची अंदाजे ८ बाय ८ ची खोली. बाकावर खेटून बसलेले ज्येष्ठ नागरिक. देखरेखीच्या खोलीतही खुर्चीला खुर्ची रेटूनच. ना डॉक्टर! ना फिजिकल डिस्टन्सिंग आणि ना धड व्यवस्था, अशी लसीकरणाची प्रक्रिया उमरेडच्या ग्रामीण रुग्णालयात सुरू आहे. हे चित्र बघितल्यावर हे कसले लसीकरण, असे संतापजनक शब्द आपसुकच व्यक्त होतात. उमरेडच्या रुग्णालयात नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी वेगवेगळ्या कक्षात विविध सुविधा झालेल्या आहेत. दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण सुरू झाले. ज्येष्ठ नागरिकांच्या लसीकरणाची व्यवस्था जुन्या इमारतीमध्ये करण्यात आली आहे. अगदी छोट्याशा जागेत नोंदणी, आसन, लसीकरण आणि देखरेख या संपूर्ण बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. शिवाय ज्येष्ठांच्या लसीकरणाची जबाबदारी परिचारिका आणि कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर ठेवण्यात आल्याचीही बाब दिसून आली. लसीकरणादरम्यान निदान एका डॉक्टरची व्यवस्था नियमितपणे ठेवण्याची गरज आहे. असे असताना लसीकरण करतेवेळी एकही डॉक्टर हजर राहत नाही, असा ज्येष्ठ नागरिकांचा आरोप आहे. ग्रामीण रुग्णालयाने लसीकरणाची जागा नवीन इमारतीत योग्य ठिकाणी करावी तसेच लसीकरण करीत असताना डॉक्टरांची व्यवस्था असावी, अशी मागणी नथ्थूजी मेश्राम, आर.बी. गजघाटे, प्रकाश वारे, अमोल आटे, रामेश्वर सोनटक्के, सुधाकर खानोरकर, अमोल खोब्रागडे, रितेश राऊत, संतोष महाजन, समर भगत, संजय मौंदेकर आदींनी केली आहे.
चार केंद्रातही लसीकरण
उमरेड तालुक्यातील चार वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. पाचगाव, बेला, सिर्सी आणि मकरधोकडा या चार आरोग्य केंद्रात ही सुविधा असून, आतापावेतो पाचगाव येथे ८७०, बेला आणि सिर्सी केंद्रात प्रत्येकी ५१५, मकरधोकडा प्राथमिक आरोग्य केंद्रात ३२५ तर उमरेड ग्रामीण रुग्णालयात ९३४ जणांचे लसीकरण पार पडले आहे.