लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी मंगळवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसची बैठक घेण्यात आली. कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस यांनी बोलाविलेल्या या बैठकीचे प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांना निमंत्रणच देण्यात आले नाही, तर काँग्रेसमधून निलंबित केलेले माजी जिल्हाध्यक्ष व माजी राज्यमंत्री राजेंद्र मुलक बैठकीत उपस्थित होते. विधानसभेतील एवढ्या मोठ्या पराभवानंतरही या बैठकीत काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. यानिमित्ताने जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये हे चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या गणेशपेठ येथील कार्यालयात झालेल्या बैठकीला खा. श्यामकुमार बर्वे, आ. संजय मेश्राम, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री राजेंद्र मुळक, कार्यकारी अध्यक्ष आश्विन बैस, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर, रश्मी बर्वे, माजी उपाध्यक्ष कुंदा राऊत, माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे, देवेंद्र गोडबोले आदी उपस्थित होते. या बैठकीत अ.भा. काँग्रेसच्या बेळगावच्या अधिवेशनात देण्यात आलेला 'जय बापू, जय भीम, जय संविधान'चा नारा गावागावात पोहोचविण्याचा संकल्प घेण्यात आला. लोकसभेत काँग्रेसचा विजय झाला. विधानसभेत पराजय झाला. मात्र, या पराभवाने खचून जाऊ नका. प्रत्येक निवडणूक वेगवेगळ्या मुद्यांवर होत असते.
ताकदीने पक्षाच्या कामाला लागा. आपण पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसह नगर परिषदांवर काँग्रेसचा झेंडा फडकवू, असा विश्वास यावेळी काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला. निवडणुकीच्या तयारीसाठी कार्यक्रम निश्चित करून विधानसभा मतदारसंघ व तालुकानिहाय बैठका घेतल्या जातील. शेतकरी, तरुण, महिला, कामगारांचे प्रश्न आजी-माजी पदाधिकारी जिल्हा व तालुका पातळीवर प्रशासनाकडे मांडतील, असा कार्यक्रम देण्यात आला.
मला बैठकीचे निमंत्रणच नाही : आष्टनकर
- जिल्हा ग्रामीण काँग्रेसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीचे आपण प्रभारी जिल्हाध्यक्ष असूनही निमंत्रण देण्यात आले नाही. असे असतानाही आपण पक्षहितासाठी कार्यालयात सर्व व्यवस्था करून दिली. मला कुणी कळविले असते, तर मी स्वतःच बैठक लावली असती, अशी प्रतिक्रिया देत प्रभारी जिल्हाध्यक्ष बाबा आष्टनकर यांनी नाराजी व्यक्त केली.
- निवडणुकीसाठी आपण 3 तालुक्याचे दौरे निश्चित केले आहेत. मंगळवारी काटोल तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची कोंढाळी येथे बैठक होती. तीत उपस्थित राहणे आवश्यक होते. विधानसभेतील अशा निकालानंतर तरी काँग्रेसमधील गटबाजी थांबावी, अशी भावना आष्टनकरांनी व्यक्त केली
"एकमेकांबद्दल मनमुटाव राहू शकतो. एवढ्या मोठ्या पक्षात ते चालणारच आहे; पण सर्वांना घेऊन चाललो तर चांगला संदेश जाईल."- संजय मेश्राम, आमदार, उमरेड
"आपण रामटेक विधानसभेत अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी काँग्रेसचे खासदार, माजी मंत्री, जिल्हा परिषद सदस्यांसह सर्व पदाधिकारी उघडपणे माझ्या प्रचाराला आले. मला मिळालेली ८२ हजार मते ही काँग्रेसची आहेत. त्यामुळे नैतिकता म्हणून बैठकीला पोहोचलो."- राजेंद्र मुळक, माजी राज्यमंत्री