हे कसले प्रथमोपचार केंद्र?
By Admin | Updated: August 29, 2016 02:33 IST2016-08-29T02:33:04+5:302016-08-29T02:33:04+5:30
नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. या कामावर असलेल्या मजुरांच्या सुरक्षेबाबत पूर्ण काळजी घेत असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे.

हे कसले प्रथमोपचार केंद्र?
मेट्रोची पोलखोल : तर कसे मिळतील उपचार ?
आनंद शर्मा नागपूर
नागपुरातील मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम जोरात सुरू आहे. या कामावर असलेल्या मजुरांच्या सुरक्षेबाबत पूर्ण काळजी घेत असल्याचा दावा सुद्धा केला जात आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. मेट्रो रेल्वेच्या मजुरांसाठी वर्धा रोडवर असलेल्या प्रथमोपचार केंद्राची पाहणी केली तेव्हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. त्याला प्रथमोपचार केंद्र म्हणावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
मेट्रो रेल्वे प्रकल्प जलदगतीने पूर्ण करण्याच्या नावावर येथे काम करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षिततेबाबत कमालीचा निष्काळजीपणा बाळगला जात आहे. रविवारी लोकमत चमूने वर्धा रोडवरील कन्स्ट्रक्शन साईटवर पाहणी केली असता ही बाब प्रकर्षाने दिसून आली. खापरी पुलापासून हॉटेल प्राईड दरम्यान वर्धा रोडवर मेट्रो रेल्वेची कन्स्ट्रक्शन साईट बनविण्यात आली आहे. येथे पिलरचे काम सुरू आहे. या साईटवरच कंत्राटदार कंपनी नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे एक प्रथमोपचार केंद्र (फर्स्ट अॅड सेंटर) सुद्धा बनविण्यात आले आहे.
लोकमत चमूने रविवारी दुपारी या परिसराची पाहणी केली. यावेळी प्रथमोपचार केंद्राचा दरवाजा बाहेरून लोटला होता. दरवाजाला ना कुंडी ना कुलूप होते. त्यामुळे दरवाजा उघडून आता पाहिले तेव्हा आतमध्ये एकही कर्मचारी नव्हता. वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. येथे एक आलमारी आहे. स्टाफसाठी कलरही लावण्यात आले आहे.
कोण करतात उपचार ?
नागपूर : मेट्रो रेल्वेने उभारलेल्या या प्रथमोपचार केंद्राचे आतमधील चित्र पाहिले असता येथे मजुरांना प्रथमोपचार दिला जात असेल असे वाटत नव्हते. या दरम्यान निर्माणाधीन मेट्रो पिलरवर चढून मजूर धोकादायक काम करताना दिसून आले. ट्रॅफिक वॉर्डन सुद्धा रस्त्याच्या बाजूला उभे राहून वाहतूक व्यवस्था सांभाळत होते. अशा परिस्थितीत एखादा अपघात घडलाच आणि त्यात मजूर जखमी झाले तर त्यांना प्रथमोपचार देणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला.
या प्रश्नाचे उत्तर माहीत करून घेण्यासाठी लोकमत चमूने कन्स्ट्रक्शन साईटवर असलेल्या इतर मजूर आणि ट्रॅफिक वॉर्डनशी चर्चा केली. तेव्हा जे काही उघडकीस आले ते आश्चर्यकारक होते. विचारपूस केली असता रविवारी ‘हाफ डे ड्युटी’ असल्यामुळे प्रथमोपचार केंद्रातील स्टाफ दुपारनंतर निघून जातो. यातून हे स्पष्ट झाले की, रविवारी दुपारपासून सायंकाळपर्यंत कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांची आणि ट्रॅफिक वॉर्डनच्या आरोग्याची सुरक्षा रामभरोसे असते.
दुखापत झाल्यास त्यांना प्रथमोपचार मिळण्याची कुठलीही शाश्वती नसते. अशा परिस्थितीत त्यांची जीव धोक्यात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.(प्रतिनिधी)