एफआयआर म्हणजे काय ?
By Admin | Updated: January 3, 2015 02:29 IST2015-01-03T02:29:45+5:302015-01-03T02:29:45+5:30
अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते.

एफआयआर म्हणजे काय ?
नागपूर : अट्टल गुन्हेगारांकडून गुन्ह्यांची कबुली वदवून घेण्याचे ठिकाण म्हणजे गुन्हे प्रकटीकरण शाखा कार्यालय. येथे रात्रंदिवस गुन्हेगारांचे आणणे - नेणे सुरू असते. आज मात्र गुन्हे प्रकटीकरण शाखेचा हॉल विद्यार्थ्यांनी खच्चून भरला होता. येथे एरवी कठोरपणे वागणारे पोलीस अधिकारी विद्यार्थ्यांसमोर हसत खेळत मार्गदर्शन करीत होते. एफआयआर म्हणजे काय, फिंगर प्रिंट कुणाचे आणि कशासाठी घेतले जातात, गुन्हेशाखेचे कामकाज कसे चालते, ते या विद्यार्थ्यांना समजावून सांगत होते.
शुक्रवारी पोलीस दलातर्फे राज्यभर ‘रेझिंग डे’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने पोलीस दलातर्फे ठिकठिकाणी विविध उपक्रमाचे आयोजन केले जातात. पोलीस आणि नागरिकांमधील रुंदावलेली दरी कमी व्हावी, नागरिक आणि विद्यार्थ्यांना पोलिसांची कार्यपध्दती माहीत व्हावी,असा त्यामागे उद्देश आहे. मातृसेवा संघ इन्स्टिट्यूट आॅफ सोशल वर्क येथे आज ‘रेझिंग विक‘चा प्रारंभ झाला.
गुन्हेशाखेच्या उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी ‘समाजातील गुन्हेगारी आणि विद्यार्थ्यांची भूमिका‘ यावर भाष्य केले. सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी विद्यार्थ्यांना महिला अत्याचार प्रतिबंध, स्त्री भ्रूणहत्या व त्याअनुषंगाने सुरक्षेचे उपाय यावर भाष्य केले. सायबर शाखेचे दिनेश दहातोंडे, यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे रोखण्याकरिता काय करावे, त्याबाबत मार्गदर्शन केले.
गुन्हेशाखेच्या कार्यालयातही आज दुपारी २ वाजता विद्यार्थ्यांचा ‘खास वर्ग’ भरविण्यात आला होता. सदरमधील डिसेंट इंग्लिश स्कूल अॅन्ड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पीआय संभाजी मुरकुटे, पीआय किशोर सुपारे, पीआय इंगोले आदींनी विद्यार्थ्यांना गुन्हेशाखेचे कामकाज कसे चालते, त्याची सविस्तर माहिती दिली. एफआयआर म्हणजे काय, त्याचे महत्त्व काय, फिंगर प्रिंट कुणाचे घेतले जातात, गुन्हेगारांना शोधण्यासाठी त्याचा कसा उपयोग होतो, वाचक शाखा, अमली पदार्थ विरोधी शाखा, सायबर क्राईम, यांची जबाबदारी काय, त्याची माहिती समजावून सांगितली. एवढेच नव्हे तर, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही दिली. (प्रतिनिधी)