विद्यार्थ्यांचा काय दोष?

By Admin | Updated: August 9, 2014 02:29 IST2014-08-09T02:29:06+5:302014-08-09T02:29:06+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभावरील सावट दूर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.

What is the fault of students? | विद्यार्थ्यांचा काय दोष?

विद्यार्थ्यांचा काय दोष?

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शंभराव्या दीक्षांत समारंभावरील सावट दूर होण्याची चिन्हे दिसून येत आहेत. अवैध पदव्यांच्या कथित आरोपांची चौकशी करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या डॉ.खडक्कार यांच्या अध्यक्षतेखालील समितीने शुक्रवारी प्रभारी कुलगुरू अनुपकुमार यांना अहवाल सादर केला. विद्यार्थ्यांना दिलेले अंतर्गत मूल्यांकनाचे गुण जरी योग्य पद्धतीने देण्यात आले नसले तरी यात विद्यार्थ्यांचा काहीच दोष नसल्याचे म्हणत एका अर्थाने या पदव्यांना ‘क्लीनचिट’च देण्यात आली आहे. परंतु समितीने महाविद्यालयांवर मात्र ठपका ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विद्यापीठाचा शंभरावा दीक्षांत समारंभ गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी होणार होता. परंतु एकही नियमित प्राध्यापक नसलेल्या महाविद्यालयांत विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण नियमबाह्य पद्धतीने देण्यात आल्याने पदव्या वैध कशा, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यासंदर्भात गठित करण्यात आलेल्या डॉ.खडक्कार समितीचा अहवाल अपूर्ण होता. त्यामुळे संबंधित अहवालासंदर्भात नवीन समिती गठित करण्यात आली होती. यात डॉ.खडक्कार यांच्यासमवेत डॉ.के.सी.देशमुख, डॉ.डी.के.अग्रवाल, डॉ.हस्तक, डॉ.नासरे यांचा समावेश आहे. या समितीने संबंधित आरोपांसंदर्भात सुमारे तीन आठवडे चौकशी केली व १,३७८ विद्यार्थ्यांच्या गुणांसंदर्भातील सर्व तपशील तपासले. समितीने तयार केलेल्या अहवालात काही महाविद्यालयांनी चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: What is the fault of students?