स्वाईन फ्लूबाबत अनास्था का ?
By Admin | Updated: October 12, 2015 02:46 IST2015-10-12T02:46:51+5:302015-10-12T02:46:51+5:30
स्वाईन फ्लूने यावर्षी नागपुरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी दहशतीत आहे.

स्वाईन फ्लूबाबत अनास्था का ?
तीन मोठी रुग्णालये असतानाही उपचार नाही : संशयितांचे नमुने घेण्यासही टाळाटाळ
सुमेध वाघमारे नागपूर
स्वाईन फ्लूने यावर्षी नागपुरात ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या प्रादुर्भावामुळे उपराजधानी दहशतीत आहे. अपुऱ्या सोयींमुळे स्वाईन फ्लूचा धोकाही वाढत चालला आहे. परंतु महानगरपालिका प्रशासन अद्यापही गंभीर नाही. मनपाच्या आरोग्य विभागाची तीन मोठी रुग्णालये व आवश्यक मनुष्यबळ असतानाही स्वाईन फ्लूच्या रुग्णाला भरती केले जात नाही. बाह्यरुग्ण विभागाच्या वेळाही मर्यादित आहे. संशयित रुग्ण आढळून आल्यास थेट मेयो, मेडिकलला पाठविण्याची आणि पॉझिटीव्ह रुग्णांच्या घरी जाऊन औषधांचे वितरण व आकडेवारी गोळा करणे या पलीकडे विभागाला काम नाही. विशेष म्हणजे, संशयित रुग्णाचे नमुने घेण्याचे औचित्यही हा विभाग दाखवित नसल्याने नागरिकांच्या आरोग्याबाबतची अनास्था स्पष्टपणे दिसून येत आहे.
महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पाेरेशन अॅक्टनुसार प्राथमिक आरोग्य सेवा, माता व बालकांसाठी आवश्यक सेवा देणे व गरीब तसेच मध्यमवर्गीय नागरिकांच्या आरोग्याची देखभाल करण्याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे. यासाठी मनपाच्या आरोग्य विभागाकडे ३८ एमबीबीएस डॉक्टर आहेत. यातील २८ डॉक्टर नियमित असून सुमारे १० डॉक्टर कंत्राटी पद्धतीवर आहेत. त्यांच्या मदतीने स्वाईन फ्लू रुग्णांना भरती करून उपचार होणे शक्य आहे. गरज पडल्यास मेयो, मेडिकलमधील स्पेशालिस्ट डॉक्टरांची चमू मागविताही येते. परंतु शहरात २००९ पासून स्वाईन फ्लूचे रुग्ण दिसून येत असतानाही मनपाकडून प्रभावी उपाययोजना नाहीत.