विशिष्ट वेळीच सरकारचा गाढवपणा का?

By Admin | Updated: July 20, 2016 02:09 IST2016-07-20T02:09:08+5:302016-07-20T02:09:08+5:30

विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळीच मी विदर्भाचा मुद्दा उचलतो असा आरोप होतो. प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा संग्रहित ठेवून

What is the assertion of the government at a particular time? | विशिष्ट वेळीच सरकारचा गाढवपणा का?

विशिष्ट वेळीच सरकारचा गाढवपणा का?

श्रीहरी अणे : सत्तेच्या राजकारणामुळे वेगळ्या विदर्भासंदर्भात गडकरी, फडणवीसांची अडचण
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या वेळीच मी विदर्भाचा मुद्दा उचलतो असा आरोप होतो. प्रत्यक्षात कुठलाही मुद्दा संग्रहित ठेवून त्यावर मी बोलत नाही. सरकारने वेळीच शहाणपणा दाखवला तर मला अधिवेशनाच्या वेळी बोलावे लागणार नाही. परंतु विशिष्ट वेळी सरकारचा गाढवपणा का होतो, असा प्रश्न राज्याचे माजी महाधिवक्ता व विदर्भवादी नेते अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी उपस्थित केला. राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत जागांचे विभागनिहाय आरक्षण बंद व्हावे या मागणीसंदर्भात ते नागपुरात बोलत होते.
वेगळ्या विदर्भाचा मुद्दा कुठेही मागे पडलेला नाही. विदर्भावर अन्याय होत असेल तर मी त्यावर अधिवेशन काळात बोलणे गैर नाहीच. राजकीय पुढाऱ्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य व्हावे यासाठी हिंमत दाखविण्याची गरज आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व वाहतूकमंत्री नितीन गडकरी हे वेगळ्या विदर्भाबाबत सकारात्मक आहेत. परंतु ते यासाठी प्रयत्न करत नसल्याचे चित्र दुर्दैवी आहे. सत्ता टिकवून ठेवण्याची कसरत त्यांना करायची आहे व सत्तेच्या राजकारणामुळे त्यांची अडचण होत आहे, असे अ‍ॅड.अणे म्हणाले. (प्रतिनिधी)

वैद्यकीय प्रवेशात विभागनिहाय आरक्षण नको
राज्यात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत विभागनिहाय आरक्षण ठेवण्यात आले आहे. यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत कमी जागा मिळतात. जास्त जागांचा फायदा उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना होतो. परंतु विदर्भातील विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनदेखील प्रवेश मिळत नाही. गुणवत्ता यादीत मागील क्रमांकावर असलेल्या उर्वरित महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तेथील महाविद्यालयात सहज प्रवेश मिळतो. विदर्भातील विद्यार्थ्याला मात्र प्रवेश नाकारण्यात येतो ही बाब अन्यायकारक आहे, असा आरोप अ‍ॅड.श्रीहरी अणे यांनी केला. नियमांनुसार राज्य शासनाने गुणवत्ता यादीच्या आधारावरच प्रवेश दिले पाहिजेत. ही बाब न्यायप्रविष्ट असून मुख्यमंत्र्यांनादेखील निवेदन देणार असल्याचे अ‍ॅड. अणे यांनी सांगितले.
९ आॅगस्ट रोजी गडकरींच्या घरासमोर आंदोलन
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी सत्ता आल्यास विदर्भ वेगळे राज्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. यासंदर्भात त्यांनी मौन साधल्यामुळे विदर्भ राज्य आंदोलन समितीतर्फे त्यांच्या महाल येथील निवासस्थानासमोर ९ आॅगस्ट रोजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन राहणार आहे. आघाडीतील विविध संघटना यात सहभागी होतील व मी स्वत:देखील येण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती अ‍ॅड.अणे यांनी यावेळी दिली. २५ आॅगस्ट रोजी ‘ईपीएस’च्या मुद्यावरून गडकरींच्या घरासमोर होणाऱ्या आंदोलनात मी उपस्थित राहील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: What is the assertion of the government at a particular time?